
तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका नराधम पित्याने आपल्याच अवघ्या चार वर्षांच्या दोन जुळ्या चिमुकल्या मुलींची विहिरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून जुबलीनगर परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी हा जुबलीनगर गावचा रहिवासी असून त्याचे लग्न सहा वर्षांपूर्वी झाले होते. त्याला चार वर्षांच्या दोन जुळ्या मुली होत्या. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, पती-पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून सतत घरगुती वाद होत होते. याच वादातून संतापलेल्या पित्याने आपल्या मुलींची हत्या करण्याचे क्रूर पाऊल उचलल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या दोन्ही मुलींना शेतात घेऊन गेला होता. तिथे कोणीही नसताना त्याने दोन्ही चिमुकल्यांना विहिरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही बाब उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पित्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.


























































