
निवडणूक सुधारणांवरील चर्चेच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात आज जोरदार चकमक झाली. मतचोरीच्या मुद्दय़ावर जाहीर चर्चा करण्याचे आव्हान राहुल यांनी दिल्याने शहा भडकले. ‘संसद अशा पद्धतीने चालणार नाही. मी कधी, काय बोलायचे ते तुम्ही ठरवू नका,’ असे शहा म्हणाले.
व्होटचोरीचे आरोप आणि एसआयआरला विरोध हा दुटप्पीपणा!
निवडणूक सुधारणांच्या चर्चेला उत्तर देताना अमित शहा यांनी विरोधकांवर टीका केली. ‘विरोधी पक्ष मतचोरीचे आरोप करतो आणि एसआयआरला विरोध करतो. तुम्ही जिंकले की मतदार यादी चांगली, तुम्ही हरले की गडबड. हा दुटप्पीपणा आहे. काही कुटुंबे पिढय़ान्पिढय़ा मतचोरी करत असताना विरोधी पक्षनेते आमच्यावर मतचोरीचे आरोप करत आहेत, असे शहा म्हणाले.
मी कधी बोलायचे हे मीच ठरवणार
‘मला अनेक वर्षांचा संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. विरोधी पक्षनेते म्हणतात तसे होणार नाही. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी देणार, पण तो क्रम मी ठरवणार’, असे शहा म्हणाले.
निवडणूक आयुक्तांना कारवाईपासून संरक्षण का दिले, ते आधी सांगा!
शहा यांच्या उत्तरास राहुल गांधींनी आक्षेप घेतला. ‘मुख्य निवडणूक आयुक्तांना कारवाईपासून संरक्षण का दिले गेले? एवढाच माझा प्रश्न आहे. यामागे नेमका काय हेतू आहे याचे आधी उत्तर द्या. हरयाणात 19 लाख बनावट मतदार आहेत, याचे पुरावे आम्ही दिलेत. शहा यांना माझे आव्हान आहे की, त्यांनी माझ्याशी या मुद्दय़ावर जाहीर चर्चा करावी’, असे राहुल म्हणाले.
हा पळ काढण्याचा प्रयत्न
शहा यांच्या या उत्तरावर राहुल गांधी पुन्हा उठले. ‘हा पळ काढण्याचा प्रयत्न आहे. हे भीतीतून आलेले उत्तर आहे. खरे उत्तर नाही. मंत्री महोदय घाबरले आहेत’, अशा शब्दांत राहुल यांनी शहांना डिवचले.


























































