फिफा विश्वचषकाचं तापमान गगनाला भिडलंय! 20 संघ अजून ठरायचेत आणि दहा लाख तिकिटे विकली गेली

जगात सध्या दोन गोष्टींना सर्वाधिक मागणी आहे, एक म्हणजे मोफत वाय-फाय आणि दुसरी म्हणजे फिफा विश्वचषकाची तिकिटं! फिफाने नुकताच अपडेट दिलाय की, 2026 च्या या ऐतिहासिक स्पर्धेची 10 लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत! आणि अजून 48 पैकी 20 संघ ठरायचे बाकी आहेत! म्हणजे संघ ठरायचे पुढे, पण प्रेक्षकांनी सीट आधीच बुक केलीय. पैसे आधी, खेळाडू नंतर!

या वेडात सर्वात पुढे आहेत, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको, हे तिन्ही यजमान देश. त्यांच्या मागे इंग्लंड, जर्मनी, ब्राझील, स्पेन, कोलंबिया, अर्जेंटिना आणि फ्रान्स या देशांनी आपल्यालाही तिकिटे मिळतील का? अशी विनंती केली आहे.

फिफाने सांगितलं की, एकूण 212 देशांतील लोकांनी तिकिटं घेतली आहेत. म्हणजे जगाच्या कुठल्या तरी कोपऱयात बसलेला एक फॅन आपल्या मुलाला सांगतोय, बाळा, आपल्या अंगणात नसेल पण आपल्या बँक खात्यात विश्वचषक नक्की आहे!

आता किमती ऐकून मात्र हृदयाचा ठोका फुटबॉलपेक्षा वेगात धावतो. न्यू जर्सीतील फायनलसाठी तिकीट दर 9,538 ते 57,500 डॉलर्स! म्हणजे एवढय़ा पैशात एखादा माणूस हिंदुस्थानात तीन मॅरेज हॉल बुक करून वरातीसह लग्न उरकू शकतो… पण इथे लोक फक्त 90 मिनिटं बघण्यासाठी तेवढं देतायत.

फिफा अध्यक्ष जियानी इन्फॅन्टिनो तर म्हणाले, इतिहासातील सर्वात मोठा, सर्वात समावेशक विश्वचषक! हो, अर्थातच! एवढय़ा किमती पाहून समावेशकतेचा अर्थच बदलला आहे, आता खेळात नाही, तर बँक बॅलन्समध्ये समावेश असणं आवश्यक आहे!

पण जगात फुटबॉलची ही क्रेझ आहे!

ब्राझीलच्या समुद्रकिनाऱयावर, इंग्लंडच्या पबमध्ये, मेक्सिकोच्या गल्लीबोळात आणि हिंदुस्थानच्या छोटय़ा चहाच्या टपरीवर सर्वत्र एकच विषय ः यावेळी मेस्सी खेळणार का?

नेमार बरा आहे का? तिकीट मिळेल का? आणि उत्तर? ः तिकीट मिळालं नाही तरी चालेल… पण हृदयात मात्र प्रत्येक चाहत्याचा ‘गोल’ नक्की लागलाय!