
सामना प्रतिनिधी । पाचोड
बीडकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या ट्रकने समोरील दुचाकीस जोराची धडक देऊन एक जणास गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार, १ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास संभाजीनगर- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आडगाव जावळे (ता. पैठण) शिवारात घडली. धडक दिल्यानंतर पळून जाणाऱ्या ट्रकमध्ये बेकायदा वाहतूक करून कत्तलीसाठी जाणारी पंधरा जनावरे सापडल्याने पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.
गुरुवारी रात्री संभाजीनगर-सोलापूर रस्ते महामार्गाने संभाजीनगरकडे सरकारी कामकाज करण्याकरिता पोलीस नाईक चरणसिंग सुलाने जात असताना त्यांना आडगाव जावळे शिवारात एका ट्रक (एमएच-१८, बिजी-०७७७) ने दुचाकी (एमएच-२०, सीइ- १९६) ला जोराची धडक देऊन पळ काढल्याची घटना दृष्टीस पडली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाचोड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गोरक्षनाथ कणसे, नरेंद्र अंधारे, काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातग्रस्त ट्रकची बारकाईने पाहणी केली असता त्या ट्रकमध्ये बेकायदेशीरीत्या पंधरा जनावरे भरून नेत असल्याचे उघड झाले. सर्वप्रथम पोलिसांनी दुचाकीस्वार सुनील सोमीनाथ छत्रे राहणार संभाजीनगर यास १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस संपर्क करून संभाजीनगरला हलविले. त्यानंतर ट्रकमधील कोणत्याही प्रकारची गुरांची वैद्यकीय तपासणी झाले नसल्याचे दिसून आले. संबंधित ट्रकचालकाने ट्रकमधील गुरांचा वैद्यकीय तपासणी अहवाल, गुरांच्याच्या अन्नपाण्याची पुरेशी व्यवस्था, त्यांची सुव्यवस्थित वाहतूक न करणे वेगावर नियंत्रण न ठेवणे आदी बाबी आणि नियमाचे उल्लंघन झाल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी संबंधित ट्रक एका खासगी चालकाच्या मदतीने पाचोड पोलीस ठाण्यात आणून जप्त केला व ट्रकमधील असलेली १५ जनावरे पारुंडी (ता. पैठण) गोशाळेत सोडण्यात आले. त्यानंतर सरकारी पक्षातर्फे पो.ना. गोरख कणसे यांच्या फिर्यादीवरून संबंधित ट्रकचालकाविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने पोलिसांचा संशय बळावून कत्तलीसाठी जाणाऱ्या १५ जनावरांची सुटका झाली असून, पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पाचोड पोलीस करीत आहेत.































































