
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर आवारातील मुखदर्शन सुविधा अचानक बंद करण्यात आल्याने शनिवारी दुपारी भाविक व देवस्थान कर्मचारी तसेच सुरक्षारक्षकांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर तणाव निवळल्याची माहिती निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी दिली.
सलग सुट्ट्यांमुळे आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दी नियंत्रणासाठी पोलीस व विश्वस्तांनी शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास मंदिर प्रांगणातील उत्सवमूर्ती अर्थात पिंडीच्या मुख दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली. दीड तासात सुमारे पाच हजार भाविकांनी या दर्शन सुविधेचा लाभ घेतला. मात्र, याला तेथील पुजाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने देवस्थान प्रशासनाने मुख दर्शनासाठी उघडलेले उत्तर महाद्वार बंद केले. त्यामुळे दर्शन न घडल्याने आलेले भाविक संतापले. हैद्राबाद येथून आलेल्या भाविकांच्या समूहाने दरवाजा जोरजोरात वाजवत उघडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले. भाविकांनी सुरक्षारक्षकांसह व्यवस्थापकांना चपलेने मारहाण केल्याची तक्रार मंदिर प्रशासनाने पोलिसांकडे केली. पोलिसांनी भाविकांना ताब्यात घेतले, चौकशीअंती त्यांना सोडण्यात आल्याची माहिती त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दिली.
आवारातील दर्शन सुविधा ऐच्छिक आहे. ज्यांना रांगेतून मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे ते भाविक त्याच पद्धतीने दर्शन घेतात. मात्र, कालच्या प्रकारामुळे ही आवारातील दर्शन सुविधा बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक शिवभक्तांना दर्शनाविनाच घरी परतावे लागले. गर्दीच्या काळात ही सुविधा सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.