बेस्ट बसमध्ये प्रवासी भिडले

बेस्टच्या 201 क्रमांकाच्या बसमध्ये प्रवासी एकमेकांमध्ये भिडल्याची घटना रविवारी संध्याकाळी जुहू बस स्थानकात घडली. नेमक्या कुठल्या वादातून ही घटना घडली ते समजू शकले नाही. मात्र प्रवाशांमध्ये हाणामारी झाली.

ती बस जुहू स्थानकात उभी असताना अचानक प्रवाशांमध्ये वादाचा भडका उडाला. काही समजायच्या आता वाद चिघळला आणि एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बसमध्ये चालक वाहक नव्हते. संतप्त प्रवाशांनी हाणामारी बरोबरच बसच्या काचादेखील फोडल्या. हा प्रकार लक्षात येताच बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. अखेर पोलिसांना बोलावल्यानंतर  बेस्ट बसमध्ये सुरू असलेला वाद मिटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.