
गाणे लावण्याच्या वादातून मिंधे गटाच्या गुंडांनी एका तरुणाच्या डोक्यात हातोडा घालून त्याला हॉकीस्टिक आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार टिटवाळा परिसरातील रायते येथील आदित्य फार्महाऊसवर घडला. गटारी अमावास्यानिमित्ताने या ठिकाणी तरुणांचे दोन गट आले होते. त्यावेळी हा राडा झाला. मिंध्यांच्या गुडांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गटारी अमावास्यानिमित्त टिटवाळाजवळील रायते येथील आदित्य फार्महाऊसवर करण जाधव हे आपल्या मित्रांसह पार्टी करण्यासाठी गेले होते. रात्रीच्या सुमारास फार्महाऊसवर गाणे लावण्यावरून करण जाधव याचा दुसऱ्या गटासोबत वाद झाला. याचदरम्यान मिंधे गटाचा पदाधिकारी विकी भुल् लर हा आपल्या साथीदारांसह या फार्महाऊसवर आला. त्याने करण जाधव यांच्यावर हल्ला केला. भुल्लर आणि त्याच्या सहकारी गुंडांनी जाधव यांच्या डोक्यात हातोडा घातला.