‘वारणा उद्भव’चा ४५४ कोटींचा अंतिम प्रस्ताव सादर; ऑगस्टमध्येच योजनेला तांत्रिक मान्यता मिळण्याची शक्यता

सांगली व कुपवाड शहरांसाठी वारणा उद्भव योजनेचा ४५४ कोटींचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे. या प्रस्तावातील त्रुटी दूर करून शुक्रवारी हा प्रस्ताव पुन्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे (एमजीपी) सादर केला आहे. विभागीय अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर राज्य शासनाकडे प्रस्ताव जाणार आहे. त्यामुळे ऑगस्टमध्येच या योजनेला तांत्रिक मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

सांगली व कुपवाडमध्ये नागरी वस्ती वाढत असून, लोकसंख्येत वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी महापालिकेने वारणा उद्भव योजना पुढे आणली होती. स्व. मदनभाऊ पाटील यांनी सांगली व कुपवाडसाठी वारणा उद्भव योजना मंजूर करून आणली होती. मात्र २००८ मध्ये महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर योजनेमध्ये बदल करण्यात आला. वारणा योजनेचे पाणी आणण्यापेक्षा सांगली व कुपवाडमधील पाणीपुरवठा अंतर्गत बळकटीकरण करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार योजनेचे काम झाले आणि वारणा उद्भव योजना बारगळली होती. त्यानंतर २०१३ मध्ये महापालिकेत पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यानंतर वारणा उद्भव योजना राबविण्याचा ठराव झाला. मात्र, शासनाकडे हव्या त्या प्रमाणात पाठपुरावा झाला नाही. २०१९ मध्ये पुन्हा वारणेचा विषय पुढे आला.

मदनभाऊ पाटील युवा मंचच्या वतीने वारणा योजनेसाठी आंदोलने केली. आमदार सुधीर गाडगीळ यांनीदेखील वारणेसाठी पाठपुरावा केला. या काळातच सामाजिक संघटनांकडून वारणा उद्भव योजनेऐवजी चांदोली धरणातून पाणी आणावे, या मागणीचा आग्रह धरला. तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांनी तज्ज्ञांची मते घेतली आणि चांदोली योजना मनपाला परवडणारी नसल्याने वारणा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पुणे येथील सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. कंपनीच्या वतीने

८१ एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र
चार महिन्यांत अहवाल तयार करण्यात आला असून, ४५४ कोटींवर ही योजना गेली आहे. यामध्ये गावठाणातील जुनी जलवाहिनी बदलून नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. सांगली व कुपवाडमध्ये ५५० कि.मी. नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे.

२०५५ पर्यंतची संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून योजना
या योजनेचा डीपीआर तयार करताना सांगली व कुपवाड शहरांत २०५५ पर्यंतची संभाव्य लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार योजना तयार केलेली आहे. माळबंगला येथे सध्या ७० व ५६ एमएलडी क्षमतेची दोन जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. यातील ५६ एमएलडी क्षमतेचे केंद्र कालबाह्य झाले आहे. ते टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. याठिकाणी नवीन ८१ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर सांगली व कुपवाड शहरांसाठी रोज २० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी उपसा जास्त होणार आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी महापालिकेने ही योजना हाती घेतली आहे.

या वर्षात कामाला सुरुवात होणार?

योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पण यामध्ये काही त्रुटी होत्या. त्या दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेचे विशेष अधिकारी सुनील पाटील यांच्या प्रस्तावातील त्रुटी दूर केल्या. शुक्रवारी हा प्रस्ताव पुन्हा एमजीपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. दोन दिवसांत राज्य शासनाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव जाणार आहे. राज्य शासनाची तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय मंजुरी मिळेल, त्यामुळे या वर्षात वारणा योजनेच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

वारणा योजनेमधील तरतुदी
समडोळीतील कोळंकीमध्ये जॅकवेलपासून
माळबंगल्यापर्यंत ११ कि.मी. लांबीची जलवाहिनी
नदीवरून मुख्य जलवाहिनी नेण्यासाठी ३०० मीटर ब्रिज
सांगली, कुपवाडला ५५० कि.मी. अंतर्गत जलवाहिन्या