
>> संजय कऱ्हाडे
अँडरसन-तेंडुलकर मालिकेचा शेवटचा कसोटी सिनेमा, सॉरी कसोटी सामना आजपासून ओव्हलवर खेळला जाणार आहे. मँचेस्टरचा कसोटी सामना अनिर्णित राहणार असं स्पष्ट झाल्यापासून बेन स्टोक्स आणि कंपनी ज्या पद्धतीने वागतेय तेच पाहून माझ्या हातून कसोटी सामनाऐवजी कसोटी सिनेमा असं लिहिलं गेलं. चूक त्यांच्यामुळेच झालीय!
जडेजाशी वाद घालणं, ब्रूकसारख्याला गोलंदाजी देणं, जडेजा-सुंदरच्या खणखणीत शतकांची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करणं, मैदानावर एक अन् पत्रकार परिषदेत दुसराच सूर लावणं हे सगळं कसोटी क्रिकेटच्या पावित्र्याला बोट लावण्यासारखंच होतं. आणि इतका सारा पसारा सांडणं कमी होतं म्हणून ओव्हलच्या मैदानाची निगा राखणाऱया ली पहर्टिस नावाच्या महाशयांनी दर्शन दिलं. त्याने आपल्या संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला खेळपट्टीपासून अडीच मीटर दूर उभं राहायला सांगितलं, बडबड केली, आवाज चढवला. म्हणे, त्याची-माझी ओळख नाही. जणू गंभीरची सावली खेळपट्टीवर पडल्याने खेळपट्टी विटाळणार होती! इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅपुलमसाठी मात्र पहर्टिस महाराजांनी निराळा न्याय लावला.
माझ्या मते ही सारी ब्रिटिशांची नाटपं आहेत. पराभवाच्या जबडय़ातून यशस्वीपणे बाहेर पडणाऱया संघाचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न आहे. चौथ्या कसोटीचा ‘अनिर्णित’ हा निर्णय हिंदुस्थानसाठी ‘विजयासारखा’ होता; पण इंग्लंडसाठी ‘पराभवासारखा’. हिंदुस्थानी संघाला तब्बल पाच सत्रांत बाद करून विजय मिळवता न आल्यामुळे आलेलं वैफल्य, सल त्यांच्या वागणुकीतून व्यक्त होत आहे.
अर्थात, या रडक्या-चिडक्या बिब्ब्यांकडे साफ दुर्लक्ष करून आपण या शेवटच्या कसोटीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उतरलं पाहिजे. बॅझबॉलचा बागुलबुवा धुडकावून टॉससाठी मैदानात उतरलं पाहिजे.
टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजी करा, टॉस हरलात तर स्टोक्स बॅझबॉल खेळणारच आहे. अतिरिक्त फलंदाजाऐवजी परिणामकारक गोलंदाजाला म्हणजे पुलदीप यादवला संघात स्थान द्यायला हवंय.
हा सामना करो या मरो असा आहे हे बुमराला निक्षून सांगितलं पाहिजे. बुमराने स्वतःचं वर्पलोड देशाला त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांच्या लोडपेक्षा अधिक मोठं ठरवलं तर त्याची आणि पंभोजची जागा आकाश अन् अर्शदीपला द्यायला हवी. सिराज, तुम जियो हजारों साल! पंताच्या जागी संघात येणाऱया जुरेलला तर ध्रुवताऱयाचं अढळपद पटकावण्याची संधी आहे! हा सामना मालिकेचा शेवटचा सामना आहे. भैरवीचा सूर-नाद भीमसेनजींच्याच खणखणीत आवाजात ऐकायला मिळावा!