शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची हालचाल एकीकडे सुरू झाली असताना दुसरीकडे विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.  पुणे, संभाजीनगर, नागपूर या मतदारसंघातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातील परिपत्रक जाहीर करीत वरील घोषणा केली आहे. विधान परिषदेच्या संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण लाड, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसागावकर हे येत्या 6 डिसेंबर रोजी निवृत्त होत असून या जागांसाठी 2026 मध्ये निवडणुका जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघासाठी मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला.

यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकानुसार 1 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. या मतदार याद्यांसाठी नावनोंदणीकरिता 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल मिळणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदार यादी 25 नोव्हेंबरला जाहीर केली जाणार असून त्यावर हरकती आणि सूचनेसाठी 10 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर 30 डिसेंबरला या मतदारसंघांसाठीची अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.