ह्दय आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी दररोज किती पावले चालणे गरजेचे आहे, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्याच्या घडीला प्रत्येक व्यक्ती आपल्याला आरोग्याबाबत सजग होताना दिसत आहे. दररोज किती चालायचं याबाबत आजही प्रत्येकाच्या मनात संभ्रम दिसून येतो. उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यावर भर देणे गरजेचे आहे. याकरता सर्वात उत्तम पर्याय चालणे हा आहे. चालण्याचा व्यायाम हा सर्वात सोपा आणि सहज करता येणारा व्यायाम प्रकार आहे. चालण्यासाठी वय, फिटनेस किंवा ठिकाण याची अट नसते. विशेष साधने, जिम किंवा नियोजनाची गरज नसते, याकरता फक्त आपण चांगली पादत्राणे वापरणे हे खूप गरजेचे आहे. चालण्यासाठी आरामदायी बूट असल्यास, चालणे हे सुखकर होते.

दररोज 10,000 पावले चालण्याची सवय सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. चालण्याचे आपल्या आरोग्यासाठी खूप सारे उत्तम फायदे होतात.

दररोज 10,000 पावले चालणे हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी खूप फायदेशीर ठरते. तसेच उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी नियमित चालणे हे खूप गरजेचे मानले जाते. दररोज 10 हजार पावले चालल्याने हृदयविकार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. वेगाने चालल्याने रक्ताभिसरण सुधारते, रक्तदाब कमी होतो आणि कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्स नियंत्रणात राहतात.

प्रीडायबेटिस किंवा टाइप 2 डायबेटिस असलेल्या व्यक्तींमध्ये 10 हजार पावले चालल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. चालताना स्नायू ग्लुकोज अधिक प्रमाणात वापरतात, ज्यामुळे इन्सुलिनची गरज कमी होते. यामुळे जेवणानंतर साखर वाढण्याचे प्रमाण कमी होते आणि HbA1c पातळीही घटते.

मानसिक आरोग्यासाठी चालणे हे खूप उत्तम मानले जाते. दररोज चालल्याने ताण, चिंता आणि नैराश्य कमी होते. नियमित चालण्यामुळे मूड सुधारतो आणि ऊर्जा वाढते. एंडॉर्फिन्ससारखे ‘फील-गुड’ हार्मोन्स वाढतात. कोर्टिसोलमुळे आपला ताण कमी होतो. तसेच आपली झोपही सुधारते आणि मानसिक शांतता मिळते.

वाढते वजन हे सर्वांसाठी डोकेदुखी होत आहे. दररोज 10 हजार पावले चालणे हे वजन कमी करण्यासाठी जादुई उपाय आहे. यामुळे कॅलरी बर्न होण्यासही मदत होते. त्याचबरोबरीने आपली उर्जा वाढते आणि थकवाही कमी होतो.