
साध्या लोकल ट्रेनप्रमाणे एसी लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांचा टक्का वाढला आहे. फुकटात एसीची हवा खाणाऱ्या या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात तिकीट तपासणी मोहीम तीव्र करून 1325 फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 4 लाख 5 हजार 990 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये दुप्पट फुकटे प्रवासी जाळ्यात सापडले.
पश्चिम रेल्वेवर विरार, डहाणूहून चर्चगेटला येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये ‘पीक अवर्स’ला जीवघेणी गर्दी असते. त्या गर्दीत लोकलमध्ये चढणे मुश्कील होते. त्यामुळे अनेक प्रवासी एसी लोकलमधून नियमबाह्य प्रवास करू लागले आहेत. त्यात विनातिकीट प्रवाशांची एसी लोकलमध्ये घुसखोरी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने एसी लोकलमध्ये टीसींच्या समर्पित पथकामार्फत तिकिट तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे.
रेल्वेकडे वाढत्या तक्रारी
विनातिकीट प्रवाशांबरोबरच जनरल डब्याचे प्रवासी अनेकदा एसी लोकलमध्ये घुसखोरी करतात. त्यामुळे पासधारक प्रवाशांना जादा पैसे मोजूनही प्रवासात गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नियमित प्रवासी रेल्वेकडे वेळोवेळी तक्रारी करीत आहेत. त्यांच्या वाढत्या तक्रारींमुळे रेल्वे प्रशासनाने फुकट्या प्रवाशांविरोधातील कारवाईची मोहिम तीव्र केली आहे.
एसी लोकलमधील विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी ‘समर्पित पथक’ कार्यरत आहे. विशेष पथकामुळे अनेक विनातिकीट प्रवासी जाळ्यात सापडत आहेत. प्रवाशांनी वैध तिकीट काढूनच एसी लोकलमधून प्रवास करावा, अन्यथा दंड वसुलीबरोबर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी दिली.