रोह्यात गतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेला आग; दिवाळी सुट्टीमुळे ५६ मुले बचावली

ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचालित प्रेरणा गतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेला आग लागल्याची घटना रोह्याच्या अंधारआळी परिसरात घडली. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच शाळेतील कॉम्प्युटर, फर्निचर, सीसीटीव्ही युनिट, वायफाय सिस्टम, स्टेशनरी साहित्य व खेळणी जळून खाक झाली आहेत. शाळेत एकूण ५६ गतिमंद विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिवाळीनिमित्त त्यांना सुट्टी असल्याने सुदैवाने ते बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे.

दिवाळीनिमित्त शाळेला सुट्टी असून व्यवस्थापकीय कामासाठी काही तासांसाठी शाळा सुरू ठेवली जाते. दरम्यान मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शाळेच्या कौलांतून अचानक धूर येऊ लागला. शाळेतील लाकडी व कागदी साहित्यामुळे आग पसरली. आगीची माहिती मिळताच अंधारआळी आणि धनगरआळीमधील रहिवाशांनी मदतकार्य सुरू करत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. शाळेतील इलेक्ट्रिक साहित्य हिट होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शिवसैनिक मदतीला धावले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंधारआळी शाखाप्रमुख प्रीतम देशमुख यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने संस्थेच्या अध्यक्षा दर्शना आठवले आणि तालुकाप्रमुख नितीन वारंगे यांना याबाबत माहिती दिली. तसेच अंधारआळी व धनगरआळीतील युवकांच्या मदतीने शाळेचे कुलूप तोडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, संतोष पोटफोडे, समीर सकपाळ, शिवसेना श्रीवर्धन विधानसभा अधिकारी राजेश काफरे, रवींद्र चाळके यांनी घटनास्थळी धाव घेतली व संस्थेच्या संचालकांना धीर दिला.