
भाईंदरमध्ये कस्तुरी हाईट्स इमारतीत आज सकाळी आगीचा मोठा भडका उडाला. इमारतीच्या डक्टमध्ये शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून काही क्षणातच सातव्या मजल्यापर्यंत धुराचे लोट पसरले. धुरामुळे अनेक रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला. यात तीन वर्षांचा चिमुकला बेशुद्ध पडला. सुदैवाने तातडीने उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. भाईंदर पूर्वेला इंद्रलोक परिसरात कस्तुरी हाईट्स ही इमारत आहे. आज सकाळी अचानक या इमारतीमध्ये आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता डक्टमध्ये आगीचे लोट उसळले. प्रचंड धुराने नागरिकांची पळापळ झाली. रहिवाशांनी एकमेकांना माहिती देत इमारतीबाहेर पळ काढला. दरम्यान, यात एका बालकासह काही रहिवाशांना धूरकोंडीमुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


























































