आयशरमधून केमिकल गळती, आग लागून घरे, वाहने भस्मसात

17

सामना प्रतिनिधी । नेवरगाव

येथून जवळच असलेल्या मुद्देशवाडगाव येथे आयशरमध्ये असलेल्या केमिकल्सच्या बॅरलमधून केमिकल गळती झाल्याने मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास आग लागून आशयरचा स्फोट झाल्याने आसपासची घरे, वाहने व झाडे या आगीत जळाली. या प्रकरणी चालकास ताब्यात घेतले असून, या घटनेची नोंद गंगापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मध्यरात्री लागलेल्या आगीत शिवसैनिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

गुजरातहून कर्नाटकला वीज वितरण कंपनीचे साहित्य घेऊन निघालेले आयशरचालक वुंâडलिक चित्ते हे वाटेत गंगापूर तालुक्यातील मुद्देशवाडगाव येथे आपल्या सासूरवाडीला मध्यरात्री आले होते. आयशरमध्ये केमिकल्सच्या दोनशे लिटरचे २७ बॅरल होते. लागलेल्या आगीने या सर्व बॅरलचा स्फोट होऊन त्यातील केमिकल चोहोबाजूस पसरले. अप्पासाहेब भडके व रघुनाथ राजपूत यांचे घर, मोटारसायकल, तीन सायकली, गोठ्याला आग लागली. त्याचबरोबर आजूबाजूची झाडे व गल्लीत केमिकल पसरल्याने सर्वत्र आगीचे लोळच लोळ दिसत होते. अचानकपणे रात्री उशिरा अग्नीचे तांडव बघून नागरिक भयभीत झाले. परंतु शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि इतर शिवसैनिकांनी सतर्कता दाखत नागरिकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्याचबरोबर शाखाप्रमुख नवनाथ भुसारे यांनी शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधून संभाजीनगरहून अग्निशमन दलाची गाडी मुद्देवाडगाव येथे घटनास्थळी पाठवली. पुढील अनर्थ टाळला, अन्यथा संपूर्ण गाव आगीच्या विळख्यात सापडले असते.

या आगीत अंदाजे पंधरा ते वीस लाखांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आग विझविण्यासाठी ग्रामस्थांसह शिवसैनिक दिलीप पैकराव, बाळू भुसारे, दत्ता भुसारे, गुलजार शेख मुजीम शेख यांनी आटोकाट प्रयत्न केले. केमिकलच्या वासाने घटनास्थळी दत्तात्रय घुन्हे व नपसीर हरुण शेख हे बेशुद्ध झाले होते. त्यांना तात्काळ गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली, तर आयशरचालक कुंडलिक चित्ते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या