आगडोंब – रसायनीत कंपनी भस्मसात; भिवंडीत दहा गोदामे खाक

रसायनी एमआयडीसीमधील सुप्रिया केमिकल या रसायन तयार करणाऱ्या कंपनीला बुधवारी दुपारी आग लागली. या आगीची तीव्रता एवढी होती की आजूबाजूच्या कंपनीतील आणि कराडे गावातील रहिवासी सैरावैरा पळू लागले. खोपोली नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी केमिकल कंपनीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

भिवंडी काल्हेर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या राजलक्ष्मी कंपाऊंडमधील कपड्यांच्या गारमेंट कंपनीला मंगळवारी रात्री अचानक भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. अचानक लागलेली आग काही क्षणातच नियंत्रणाबाहेर गेली अन् जवळपास दहा गोदामे भस्मसात झाली. गोदामातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. मात्र आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीच्या तीव्रता एवढी होती की संपूर्ण इमारतीला आगीचा वेढा पडला होता-त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हल विण्यात आले आहे. ही आग नियंत्रणात येण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल पाच तास लागले. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.