
सामना प्रतिनिधी । रेडा
अकलूज रस्त्यालगत असलेल्या इंदापूर नगरपरिषदेच्या कचरा डेपोस आज (दि. ३१) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत नगरपालिकेने नुकत्याच उभारलेल्या अद्ययावत शेडसह लाखो रुपयांचा कचरा भस्मसात झाला. गंभीर बाब म्हणजे नगरपालिकेकडे स्वत:चा अग्निशमन बंब नसल्याने समोर लागलेली आग दिसूनही नागरिक व नगरपालिका पदाधिकाऱ्यांना फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागली.
इंदापूर शहरातील कचरा नगरपरिषदेच्या माध्यमातून अकलूज रस्त्यालगत असलेल्या कचरा डेपोत साठविला जातो. तेथे कचऱ्याचे वर्गीकरण करून पुढील प्रक्रिया केली जाते. या कचरा डेपोसाठी नगरपरिषदेने लाखो रुपये खर्चून नुकतेच अद्ययावत शेड उभी केली आहे. शहरातील कचरासंकलनासाठी नगरपरिषदेच्या वतीने एका कंपनीला काम देण्यात आले आहे. २०१८च्या स्वच्छ भारत अभियानामध्ये ४ हजार २०० नगरपरिषदांमधून इंदापूर नगरपरिषदेने देशात ६८व्या स्थानी, तर पश्चिम विभागात राज्यात ४५वा क्रमांक पटकाविला.
देशपातळीवर स्वच्छता मोहिमेत इंदापूर नगरपरिषदेचा गौरव होत असतानाच आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येथील कचरा डेपोस भीषण आग लागली. आगीचे कारण अद्यापि समजू शकले नाही. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोळ उठले आहेत. या आगीत पालिकेने नुकत्याच उभारलेल्या अद्ययावत शेडसह लाखो रुपयांचा सुका कचरा जळून खाक झाला. जवळपास ३५० मेट्रिक टन सुका कचरा या आगीत जळाल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्थानिक नागरिकांसह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक तसेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, नगरपरिषदेकडे स्वत:चा अग्निशमन बंब नसल्याने सर्वांच्या डोळ्यांसमोर कचरा डेपोतील शेडसह लाखोंचे नुकसान होत होते. आग विझविण्यासाठी कोणालाच काही करता येत नसल्याने अखेरीस मुवुंâद शहा यांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या आqग्नशमन बंबाला पाचारण केले. मात्र, तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर भडकली. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन कर्मचारी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करत होते.
ठेकेदार बदलण्याची मागणी
नगरपरिषदेच्या मालकीच्या कचरा डेपोला सतत आग लागते तरीदेखील ठेकेदार इकडे फिरकत नाहीत. याबाबत कोणतीही उपाययोजना घेत नाही. त्यामुळे ठेकेदार बदलावाच लागेल, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बोलून दाखवली.
आग लागली का लावली?
मागील काही दिवसांपासून या कचरा डेपोला ७ ते ८ वेळा आग लागल्याचे प्रकार घडले. वारंवार कचरा डेपोला आग लागत असताना नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत होते. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच इंदापूरकरांचे आज लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यास नगरपरिषद प्रशासनच जबाबदार असून, आर्थिक फायद्यासाठी आग लावली जाते का आपोआप लागतेय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पोपट शिंदे, श्रीधर बाब्रस, अशोक मखरे यांनी केला आहे.































































