
बॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील जुहू भागात असणाऱ्या घराबाहेर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी रात्री रोहित शेट्टीच्या घराबाहेर चार राऊंड फायर करण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांचे पथक, क्राइम ब्रँचचे अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
मुंबईतील जुहू भागात रोहित शेट्टी याचे घर आहे. शनिवारी रात्री 12 वाजून 43 मिनिटांनी त्याच्या घराबाहेर चार राऊंड फायर करण्यात आले. याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैन्यात केले. या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
इमारतीच्या दिशेने गोळीबारा करण्यात आला असून आम्ही गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी सर्व शक्य दृष्टिकोनातून तपास करत आहोत, असे मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितले. तसेच या घटनेत सामील आरोपींची ओळख पटवण्यासाठी विविध बाजूंनी तपास केला जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले जात आहे. सध्या तपास सुरू असून हल्ल्यामागील कारण अस्पष्ट आहे.
दरम्यान, रोहित शेट्टी याच्या घराबाहेरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे दिसत आहे. रोहितच्या घराबाहेर पोलीस वाहने, बॅरिकेड्स आणि अधिकारी तैनात असल्याचे दिसत आहे. रोहिती शेट्टी आणि त्याच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
Maharashtra | Unidentified assailants fired four rounds outside the residence of film director Rohit Shetty. Following this, heavy police security has been deployed around Rohit Shetty’s residence in Juhu. The police are currently investigating the matter diligently and… https://t.co/6Yy0I8vAnG
— ANI (@ANI) January 31, 2026
सेलिब्रिटी निशाण्यावर
रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे मुंबईत बॉलीवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधीही मुंबईत अशा घटना घडलेल्या आहेत. अभिनेते, अभिनेत्रींनी खंडणीसाठी धमक्या मिळाल्या होत्या. एवढेच नाही तर अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरही गोळीबार झाला होता. बिश्नोई गँगने याची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच मध्यंतरी कमाल खान यालाही गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आली होती.
























































