
हिंदुस्थानी लष्कर आता आणखी मजबूत होणार असून शत्रूला धडकी भरणार आहे. कारण आता आपाचे एएच-64ई लढाऊ हेलिकॉप्टरची पहिली तुकडी हिंदुस्थानी लष्कराच्या ताफ्यात दाखल झाली आहे. ही राजस्थानातील जोधपूर एअरबेसवर तैनात असेल. पूर्वी हे हेलिकॉप्टर केवळ हिंदुस्थानच्या हवाई दलाकडे होते, आता या शक्तिशाली हेलिकॉप्टरच्या तैनातीमुळे पश्चिम सीमेवर वेगाने हालचाल करता येणार आहे. लष्कराला शत्रूपर्यंत विद्युत वेगाने पोहोचता येणार आहे.
आपाचेवर बसवलेली शस्त्रे कोणत्याही युद्धभूमीत शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. एजीएम 114 हेलफायर क्षेपणास्त्र तसेच टँक आणि बख्तरबंद वाहने नष्ट करण्यातही ही हेलिकॉप्टर्स सक्षम आहेत. हायड्रा 70 रॉकेट्स, 70 मिमी अनगाईडेड रॉकेट्स, जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ला करतात. तसेच स्टिंगर क्षेपणास्त्रांनी ही हेलिकॉप्टर्स सुसज्ज आहेत, जी हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत. हे हेलिकॉप्टर एका मिनिटात 128 लक्ष्य लॉक करू शकते आणि 16 वेगवेगळ्या लक्ष्यांवर हल्ला करू शकते.
रात्रीच्या अंधारातही शत्रूचा वेध घेणार
या हेलिकॉप्टरमध्ये प्रगत सेन्सर सिस्टम असून हे नाईट व्हिजन आणि थर्मल इमेजिंक सेन्सर्सने सुसज्ज आहेत. त्यामुळे रात्रीच्या मिट्ट अंधारात आणि खराब हवामानातही शत्रूचा वेध घेता येणार आहे. याची टार्गेट ऑक्विझिशन सिस्टम आणि पायलट नाईट व्हिजन सेन्सर पायलटला कमी दृश्यमानतेतही अचूकरीत्या हल्ला करण्याची क्षमता प्रदान करतो.
एएन/एपीजी-78 लॉगबो रडार आणि जॉइंट टॅक्टिकल इन्फॉर्मेशन डिस्ट्रिब्युशन सिस्टीमने हे हेलिकॉप्टर सुसज्ज आहे. नेटवर्क केंद्रित युद्धात हे तंत्रज्ञान अतिशय प्रभावी ठरते. हे तंत्रज्ञान सीडीएल आणि केयू फ्रक्वेन्सी बँडवरील डेटा ट्रान्सफर करण्यासही सक्षम आहे.
कमाल वेग ताशी 280 ते 265 किमी आहे. हे एकाच वेळी साडेतीन तासांपर्यंत उड्डाण करू शकते. तसेच त्याची ऑपरेशनल रेंज 500 किमीपर्यंत आहे.