शाळेत यायला दोन मिनिटे उशीर झाला, पहिलीच्या विद्यार्थ्याला दोन तास उन्हात उभं केलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळेत यायला केवळ दोन मिनिटे उशीर झाला म्हणून पहिलीच्या विद्यार्थ्याला दोन तास कडक उन्हात उभं केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बंगळुरूतील येलहंका येथील एका खासगी शाळेत ही घटना घडली. याप्रकरणी बंगळुरू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

येलहंका अटूर लेआउट येथील एका शाळेत माणुसकीला कळीमा फासणारा हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शाळेत यायला केवळ दोन मिनिटे उशिरा झाला म्हणून मुलाला ही शिक्षा करण्यात आली. त्याला जवळपास दोन तास उन्हात उभे ठेवण्यात आले, असा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे. जेव्हा पालकांनी कथित शिक्षेसंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापिकेला जाब विचारला असता त्यांनी उद्धट आणि अरेरावीचे वर्तन केल्याचा दावा पालकांनी केला आहे. पालकांनी शाळेतील कर्मचाऱ्यांवर गैरवर्तनाचा आरोप करत व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

पालक मुख्याध्यापकांना जाब विचारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. बंगळुरू शह पोलिसांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेत बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नागरिकांना या घटनेचा व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.