‘हिंदुस्थानविरुद्धची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ गेल्या तीन दशकांत प्रथमच पाच कसोटी क्रिकेट सामन्यांनी होणार आहे. त्यामुळे आमच्यासाठी आता ही मालिकादेखील ‘अॅशेस’सारखीच प्रतिष्ठेची असणार आहे. नोव्हेंबरमध्ये घरच्या मैदानावर होणारी हिंदुस्थानविरुद्धची ही मालिका जिंकण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू,’ असा निर्धार ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने व्यक्त केला.
1991-92नंतर प्रथमच ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’मध्ये पाच कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. 34 वर्षीय मिचेल स्टार्क म्हणाला, ‘घरच्या मैदानावर होणाऱ्या या कसोटी मालिकेतील प्रत्येक सामना आम्हाला जिंकायचा आहे, मात्र हिंदुस्थानी संघदेखील सर्वच आघाडय़ांवर सरस आहे, याचीही आम्हाला कल्पना आहे. मात्र तरीही आम्ही ही मालिका केवळ जिंकावी असे नव्हे, तर मालिकेत निर्भेळ यश संपादन करावे, अशी माझी इच्छा आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने तसेही या मालिकेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.’ मागील दहा वर्षांपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पराभूत झालेला ऑस्ट्रेलियन संघ यावेळी जिंकण्यासाठी कमालीचा आतुर झालाय. कारण स्टार्पच्या आधी स्टीव्ह स्मिथ, सध्याचा संघाचा कर्णधार पॅट कमिन्स, फिरकीपटू नॅथन लायन आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांनीदेखील हिंदुस्थानविरुद्धची ही मालिका जिंकण्याबाबत वक्तव्ये केली आहेत. ऑस्ट्रेलियाने 2014-15पासून ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ जिंकलेली नाही, मात्र हिंदुस्थानने सलग चार वेळा ही मालिका जिंकून वर्चस्व गाजविले आहे. हिंदुस्थानने 2018-19 आणि 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या भूमीवर दोनदा पराभव केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये हिंदुस्थान सध्या पहिल्या स्थानावर असून, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.