सबसिडीतून सोलर पॅनेल बसविण्यासाठी उरले पाचच दिवस

ग्राहकांना लागणारी वीज निर्माण करण्यासाठी शासन 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवायचे असल्यास प्रथम वापरकर्त्याने दररोज किती वीज लागते, याचा अंदाज घ्यावा. सौर पॅनेलच्या माध्यमातून वीज बिल कायमचे बंद होईल म्हणून सरकारने ‘सौर रूफटॉप’ योजना आणली आहे. सबसिडीची मुदत आता 31 डिसेंबरपर्यंतच असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी दिली.

राज्यात दिवसेंदिवस विजेचा वापर वाढू लागला आहे. शेतीला सर्वाधिक  वीज लागत असल्याने केंद्र सरकारने सौरऊर्जेचा पर्याय निवडला आहे. खासगी व शासकीय जमिनी घेऊन त्याकर सौर पॅनेल उभारले जात आहेत. कोळसा, पाणी अशा समस्यांमुळे मागणीच्या प्रमाणात वीज तयार करताना अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरावर सौर पॅनेल उभारण्यासाठी देखील सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दोन-तीन पंखे, एक प्रीज, सहा-सात एलईडी लाईट्स, एक पाण्याची मोटर आणि विजेसह टीव्ही  चालवत असाल तर दररोज सहा ते आठ युनिट वीज लागेल. तेवढय़ा वीजनिर्मितीसाठी दोन किलो व्हॉट सौर पॅनेल बसवावे लागतील. दोन किलो व्हॉटसाठी चार सौर पॅनेल पुरेसे असतील.

देशात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्रालयाने सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे. सरकारकडून मिळणाऱया अनुदानाचा लाभ घेण्यासाठी, डिस्कॉम पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही किक्रेत्याकडून घराच्या छतावर सौर पॅनेल बसवावे लागतील. त्यानंतर सबसिडीसाठी अर्ज करता येतो.

25 वर्षे वीज बिल भरण्याची गरज नाही

रूफटॉप सोलर पॅनेल तीन किलो व्हॉटपर्यंत बसवले तर सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते. दहा किलो व्हॉट क्षमतेच्या सोलर पॅनेलसाठी 20 टक्के सबसिडी आहे. घराच्या छतावर दोन किलो व्हॉटचे सोलर पॅनेल लावण्यासाठी सुमारे सव्वा लाखांपर्यंत खर्च येईल. त्यासाठी सरकारकडून 40 टक्के (48 ते 50 हजार रुपये) सबसिडी मिळते. सौर पॅनेलचे आयुष्य 25 वर्षे असते. एकदा 72 हजार रुपये खर्च केल्यास 25 वर्षे वीज बिल भरावे लागणार नाही.