पाच तलाव भरले, मुंबईची पाणीचिंता मिटली

जुलै महिन्यापासून ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पावसाने केलेल्या दमदार बॅटिंगमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी पाच तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. आज पहाटे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण ओसंडून वाहू लागले. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आतापर्यंत 90 टक्के पाणीसाठा (12 लाख 89 हजार 615 दशलक्ष लिटर पाणीसाठा) जमा झाल्यामुळे आता मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार, तुळशी या छोटय़ा तलावांसह मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा आणि तानसा या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र, सुरुवातीला पावसाने या सातही तलाव क्षेत्राकडे (पाणलोट क्षेत्र) पाठ फिरवल्याने 5 जूनपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने बॅटिंग करण्यास सुरुवात केल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होऊ लागली. तलाव क्षेत्रातील पाणीसाठा 66.77 टक्क्यांपर्यंत गेल्याने 29 जुलैपासून 10 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली. मागील काही दिवसांपासून पुन्हा तलावांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाटय़ाने वाढली आहे.

मध्य वैतरणाची साठवण क्षमता 19 हजार 353 कोटी लिटर

मुंबई महापालिकेने पालघर जिह्यातील मोखाडा तालुक्यात 102.4 मीटर उंचीचे आणि 565 मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण 2014 मध्ये बांधण्यात आले. या धरणाची साठवण क्षमता ही 1 लाख 93 हजार 530 दशलक्ष लिटर म्हणजेच 19 हजार 353 कोटी लिटर इतकी आहे. हे धरण महापालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले होते.

4 ऑगस्टपर्यंतचा पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • विहार      27,698
  • तुळशी      8,046
  • मोडकसागर      1,28,925
  • मध्य वैतरणा     1,90,404
  • अप्पर वैतरणा   1,51,699
  • तानसा     1,44,063
  • भातसा     6,38,779

असे भरले तलाव 

20 जुलैला सकाळी 8.30 वाजता तुळशी तलाव ओव्हर फ्लो झाला, तर 24 जुलैला तानसा तलाव दुपारी 4.16 वा. ओसंडून वाहू लागला. त्यापाठोपाठ 25 जुलैला मध्यरात्री 3.50 वाजता विहार तलाव ओव्हर फ्लो झाला, तर गुरुवार 25 जुलैला सकाळी 10.40 वाजता मोडकसागर ओसंडून वाहू लागला. आज पहाटे 2.45 मिनिटांनी मध्य वैतरणा तलाव ओसंडून वाहू लागला. त्यानंतर तलावाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून 706.30 क्युसेक या दराने पाणी सोडण्यात आले.