
गाझामध्ये मागील मोठ्या कालावधीपासून युद्ध सुरू असून इस्रायलने हमास दहशतवादी गटाला संपवण्याच्या इराद्याने अनेक पॅलेस्टिनी नागरिकांचे बळी घेतले. त्यात पुरवठा थांबवल्याने गाझामधील पाच लाख लोक उपासमारीच्या संकटात आहेत. इस्रायलने गेल्या तीन महिन्यांपासून गाझामध्ये धान्य पुरवठ्यावर बंदी घातली आहे. निम्म्या गाझावर कब्जा मिळवल्यानंतरही इस्रायलने हल्ले वाढवले आहेत.
इस्रायलने निर्बंध हटवले नाहीत तर गाझामधील पाच लोकांपैकी एक उपासमारीला बळी पडू शकतो, असे संयुक्त राष्ट्रांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यांनी अलीकडेच गाझातील सद्यपरिस्थितीवर एक अहवाल सादर केला. तसेच 21 लाख लोकांना दुष्काळाच्या झळा बसू शकतात. मार्च 2025 मध्ये इस्रायलने हमासची कोंडी करताना गाझाला अन्न आणि इंधन पुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हमास कमकुवत होईल, असा दावा इस्रायलने केला. ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत 61 हजारांहून अधिक लोक ठार झाले आहेत.
अन्न पुरवठ्यावरील बंदी रद्द करा
गाझामधील लोकांना आवश्यक असलेले अन्न इस्रायल, इजिप्त आणि जॉर्डनमधील गोदामांमध्ये पडून आहे. ही गोदामे गाझापासून 40 किमी अंतरावर आहेत. गाझामधील उपासमार थांबवण्यासाठी गाझाला अन्न पुरवठ्यावरील बंदी तत्काळ उठवावी अशी मागणी संयुक्त राष्ट्र आणि युरोपीय देशांनी इस्रायलकडे केली आहे. इस्रायलचे हल्ले असेच सुरू राहिल्यास गाझामधील बहुतेक लोकांना पाणी, निवारा आणि औषधांसाठीही संघर्ष करावा लागेल.