
चेटकीण असल्याच्या संशयातून एका कुटुंबातील पाच जणांना गावकऱ्यांनी जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पाच जणांना जाळल्यानंतर मृतदेह त्यांचे मृतदेह नदीत फेकून देण्यात आले. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली आहे.
टेटगामा गावातील सीता देवी ही महिला चेटकीण असल्याचा संशय गावातील लोकांना होता. यानंतर रविवारी गावातील प्रमुख नकुल उरांव याच्या उपस्थितीत गावकऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला संशयित महिला सीता देवी, तिचा पती बाबूलाल उरांव, सासू कांतो देवी, मुलगा मंजीत उरांव, सून राणी देवी यांना देखील बोलावले होते.
यावेळी गावकऱ्यांनी सीता देवीसह तिच्या कुटुंबातील पाच जणांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर पाचही जणांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले. यानंतर पाचही मृतदेह नदीत फेकून देण्यात आले. या घटनेत कशीबशी स्वतःची सुटका करत बचावलेल्या सीता देवीच्या मुलाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी गावचा प्रमुख आणि मुख्य आरोपी नकुल कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.