रत्नागिरीतून पाचही आमदार शिवसेनेचे निवडून येतील – उदय सामंत

3525

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 2004 साली रत्नागिरीच्या जनतेने मला निवडून दिले. आता मी पुन्हा एकदा चौथ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहे. गावागावात माझा प्रचार सुरु असून यंदाच्या निवडणूकीत होणार्‍या मतदानाच्या ऐंशी टक्के मतदान महायुतीला होईल. त्याचबरोबर राजापूरातून राजन साळवी, चिपळूणातून सदानंद चव्हाण, दापोलीतून योगेश कदम असे एकूण पाचही आमदार शिवसेनेचे निवडून येतील, असा विश्वास शिवसेना उपनेते आणि रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आमदार उदय सामंत म्हणाले की, मी कालच मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्म स्वीकारला. मी एकमेव नशीबवान उमेदवार आहे की, माझी मुलाखतच झाली नाही. तालुकाप्रमुखांच्या बैठकीत तालुकाप्रमुख प्रदिप साळवी यांनी रत्नागिरीतून विधानसभेसाठी फक्त उदय सामंतच इच्छुक आहेत असे सांगितले होते. शिवसेनेने पुन्हा एकदा मला निवडणुकीची संधी दिली आहे. पक्षाने आणि जनतेने टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवणार आहोत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात महायुतीचा प्रचार सुरु झाला असून मी स्वतः वीस ते बावीस गावांचा दौरा केला आहे. तालुकाप्रमुख प्रदिप साळवी यांनी सर्व जिल्हा परिषद गटातून दौरा केला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला 80 टक्के मतदान होईल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

भास्कर जाधव अनुभवी राजकारणी

गुहागर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव निवडणूक लढवणार आहेत. गुहागर विधानसभा मतदार संघात बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर आमदार उदय सामंत म्हणाले की, भास्कर जाधव हे राजकारणात खूप अनुभवी आहेत. मलाही ते राजकारणात वरिष्ठ आहेत आणि या प्रसंगात मात कशी करायची हे त्यांना चांगले ठाऊक आहे. आणि ते निश्चितच या सर्वांवर मात करून गुहागरातून विजयी होतील, असा विश्वास आमदार सामंत यांनी व्यक्त केला.  त्याचबरोबर राजापूरातून राजन साळवी, चिपळूणातून सदानंद चव्हाण, दापोलीतून योगेश कदम असे एकूण पाचही आमदार शिवसेनेचे निवडून येतील. मी उपनेता असल्यामुळे महाराष्ट्रात अन्य ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दि. 4 ऑक्टोबर रोजी आमदार उदय सामंत सकाळी साडे दहा वाजता उमेदवारी अर्ज़ भरणार आहेत. त्यावेळी मराठा मैदानावर महायुतीचा विराट मेळावा होणार असून यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या