गेल्या 11 वर्षात देशात वाढली साक्षरता, पाच राज्य झाली 100 टक्के साक्षर

देशभरातील साक्षरतेचा दर झपाट्याने वाढत आहे. विशेषतः गेल्या 11 वर्षांत देशाच्या साक्षरतेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. देशात साक्षर आणि शिक्षित व्यक्तींची संख्या वाढली असून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली.

शिक्षण मंत्रालयाने सांगितले की हिमाचल प्रदेशने 100 टक्के साक्षरतेचा मान मिळवला आहे. हिमाचल प्रदेश हा देशातील पूर्ण साक्षरता मिळवणारे पाचवे राज्य ठरले आहे. हिमाचल प्रदेशने पूर्ण कार्यात्मक साक्षरता साध्य केली असून त्या पूर्वी त्रिपुरा, मिजोरम, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश लडाखनंतर हिमाचल हे पाचवे 100 टक्के साक्षर राज्य झाले आहे.

जून 2024 मध्ये लडाख हे पहिले पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश घोषित झाले होते. सोमवारी शिक्षण मंत्रालयाने नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 2025 साजरा केला. या प्रसंगी ही माहिती जाहीर करण्यात आली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की साक्षरता फक्त वाचन-लेखनापुरती मर्यादित नसून ती सन्मान, सशक्तीकरण आणि आत्मनिर्भरतेचे साधन आहे. त्यांनी सांगितले की भारताचा साक्षरतेचा दर 2011 मधील 74 टक्क्यांवरून 2023–24 मध्ये 80.9 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.