भरधाव कार थेट तलावात कोसळली, पाच मित्रांचा करुण अंत

भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट तलावात कोसळल्याने पाच मित्रांचा करुण अंत झाला आहे. तेलंगणातील यदाद्री-भुवनागिरी जिल्ह्यात शनिवारी हा अपघात घडला. एक जण कारच्या काचा तोडून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने पाचही मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

कारमध्ये एकूण सहा तरुण प्रवास करत होते. सर्व तरुण हैदराबाद येथील रहिवासी असून कारने तेलंगणातील यदाद्री-भुवनागिरी जिल्ह्याकडे चालले होते. यावेळी एका वळणावर चालकाचे अतिवेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटले. यानंतर कार थेट तलावात कोसळली.

कार तलावात कोसळल्याने पाच जणांचा बुडून मृत्यू झाला तर एक जण कारमधून बाहेर पडण्यास यशस्वी झाला. पोलीस अपघात प्रकरणी तपास करत आहेत. तसेच अपघातात बचावलेल्या तरुणाचीही पोलीस चौकशी करणार आहेत.