पूरग्रस्तांना मंत्र्यांच्या कोरड्या भेटी, दौऱ्यांचा उबग

गेल्या आठवडाभरापासून पुरासारख्या अस्मानी संकटाशी धीरोदात्तपणे सामना करणाऱया पूरग्रस्तांना मंत्री, अधिकाऱयांच्या कोरडय़ा भेटी आणि दौऱयांचा उबग आला आहे. या दौऱयांमुळे आमच्या पदरात काय पडले, असा सवाल आता पूरग्रस्तांमधून विचारला जात आहे. मदत देण्यात सरकार वेळकाढूपणा करून पूरग्रस्तांची थट्टा करीत असल्याची भावना बळावत चालली आहे. त्यातच वरच्या धरणातून सीना नदीच्या पात्रात पुन्हा एकदा मोठा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीकाठची पूरस्थिती कायम आहे. ‘भय इथले संपत नाही’, अशी अवस्था सध्या पूरग्रस्तांची झाली आहे.

वरच्या धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या विसर्गात कपात करण्यास सुरुवात झाल्यानंतर सीना, भोगावती नदीला आलेला महापूर ओसरण्यास सुरुवात झाली होती. तात्पुरत्या निवारा कक्षातील शेतकरी आणि ग्रामस्थांना आता आपल्या घराकडे जाण्याचे वेध लागले होते. सर्वत्र चिखलमय परिस्थिती असल्याने घरी जाऊन करायचे काय? खायचे काय? यांसह विविध प्रश्नांनी पूरग्रस्तांना ग्रासले होते. त्यातच पुन्हा आता वरच्या धरणातून सीना नदीत पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकाठी पुन्हा एकदा ‘जैसे थे’ स्थिती उद्भवली आहे.

या पुराच्या पाण्याचा तब्बल 22 गावांना फटका बसला आहे. यातील घाटने आणि नांदगाव या दोन गावांना पुराच्या पाण्याने पूर्ण वेढा टाकला होता. तो हळूहळू सैल होऊ लागला आहे, असे वाटत असताना आता या पुराचा वेढा आवळू लागला आहे. मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठच्या मुंडेवाडी, अष्टे, अर्जुनसोंड, लांबोटी, पोफळी, विरवडे खुर्द, शिरापूर (सो), बोपले, एकुरके, पासलेवाडी, शिंगोली, पिरटाकळी, रामहिंगनी, नांदगाव, वीरवडे बुद्रूक, शिरापूर (मो), तरटगाव, नरखेड, भोयरे, मलिकपेठ, घाटणे आणि मोहोळ या गावांना फटका बसला आहे.

पूरग्रस्तांची विविध सामाजिक आणि राजकीय नेतेमंडळींनी भोजनाची व्यवस्था केली आहे. सध्या विविध संघटनांकडून या पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र, सगळ्यात भीषण स्थिती जनावरांची झाली आहे. वैरण पुराच्या पाण्यात आहे, तर काही ठिकाणी ती पूर्णपणे वाहून गेली आहे. त्यामुळे जनावरांनी खायचे काय, या विचाराने बळीराजाचा घास घशाखाली उतरत नाही, अशी भावना विरवडे बुद्रूकच्या प्रकाश आवताडे यांनी व्यक्त केली.

पुराचा वेढा सैल होऊन तो आता पुन्हा आवळला जात असताना आता पूरबाधितांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचा पूरग्रस्त भागाचा दौरा होऊन पाच दिवस उलटून गेले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नुकतेच भेटून गेले. राज्यमंत्री योगेश कदम यांनी आढावा बैठक घेतली. काल (दि. 28) जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि.प. सीईओ कुलदीप जंगम यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. येणारा प्रत्येकजण पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतोय. मात्र, यामुळे पदरात काहीच पडत नसल्याने या अधिकारी आणि नेत्यांच्या भाकड भेटीचा पूरग्रस्तांना उबग आला आहे. आमच्या पदरात काय आणि कधी, असा सवाल पूरग्रस्त विचारत आहेत. बँकांच्या नोटिसा पूरग्रस्तांच्या दारावर डकविल्या जात असून, पोराची दुसऱया सत्राची फी कशी भरायची, या प्रश्नाने आमची झोप उडविली असल्याची वेदना विरवडे बुद्रूकच्या दिनकर पवार यांनी व्यक्त केली.

या पुराच्या पाण्याने ज्यांची घरे वाहून गेली आहेत किंवा मोठे नुकसान झाले आहे, अशा नागरिकांना तातडीने मदत होणे अपेक्षित होते. मात्र, सरकार नावाची यंत्रणा पूरबाधितांच्या संयमाची परीक्षा घेत आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय क्षीरसागर यांनी केला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीबाबत सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर पूरग्रस्तांच्या संयमाचा बांध फुटेल, अशी स्थिती सध्या आहे.