उंबराचं फुल

2269

योगेश नगरदेवळेकर

उंबराचं फुल… रुजतं एकीकडे… फळ वेगळय़ाच जागी येतं… कसा असतो हा विस्मयकारी प्रवास..

सध्याच्या काळात व्हॉटस् ऍप, फेसबुकसारखा सोशल मीडिया चालता-बोलता मुक्त आणि मोफत विद्यापीठ बनत चालला आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की, त्यातून पुढे ढकलली जाणारी बहुतांशी माहिती खरी नसतेच. हा पाठवतो म्हणून तो पाठवतो. हे आठवायचं कारण म्हणजे परत सध्या चर्चेत आलेले दुर्मिळ असं उंबराचं फूल. प्रत्येक जण भक्तिभावाने आपल्या सोबत्यांनाही या दुर्मिळ फुलाच्या दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून धडाक्यात पुढे पाठवत आहेत.

मुळात उंबराला फूल येतं का? फळ येतं म्हणजे फूल असेलच असं सर्वसामान्य मत असतं. मग फूल असत तर दिसत का नाही. यामुळे ते फूल दुर्मिळ झाले आहे. निसर्ग किती विस्मयकारी आहे हे पाहायचं असेल तर उंबर फूल. त्याचं फळ आणि त्याची दुसरीकडे रुजवण हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. पेरूच्या झाडाला फूल येतं, त्याला फळ येतं. त्या फळालाच फुलाचे अवशेष चिकटलेले दिसून येतात. हे म्हणजे फुलाच्या बाहेर फळ येते, पण समजा असं झालं की या फुलाच्या पाकळय़ा उलट दिशेने वाढल्या तर फळ आत तयार होईल ना. अगदी असाच प्रकार उंबराच्या बाबतीत असतो.

उंबराच्या खोडाला जे सुरुवातीला जे हिरवे फूल लागते ते पूर्ण फूल असते. फूल इतर फुलांमध्ये बाहेर असणारे स्त्रीकेसर पुकेसर त्या फुलाच्या आतच असतात. मग असा प्रश्न पडतो की जर हे फळाच्या आत असतील तर त्याचा परागीभवन कसं होईल? इथे निसर्गाची अद्भुतता अनुभवायला मिळते.

हिरवे उंबर जरी पूर्ण बंद दिसत असले तरी ते तसे नसते. देठाच्या विरुद्ध भागावर एक लहान छिद्र असते आणि आत पोकळी असते. खूप लहानशा छिद्रातून ‘फिग वास्प’ जातीची माशी आत शिरते. त्या छिद्रातून आत शिरताना त्यांचे पंख आणि ऍण्टेना तुटून जातात आणि ती माशी त्या फळात बंदिस्त होते, पण येताना तिने दुसऱया उंबराच्या फळातील परागकण आणले असतात ते या उंबरात फिरताना स्त्रीकेसरावर ते परागकण पसरतात आणि फुलाचे फळात रूपांतर व्हायला सुरुवात होते. याच वेळेस आत शिरलेली ‘फिग वास्प’ तिची अंडी आतील फुलांमध्ये टाकते.

 यातही उंबराच्या फुलांमध्ये तीन प्रकारची फुलं असतात. नर जातीची, मादी जातीची अखूड फुले आणि मादी जातीची लांब फुले, फिग वास्प फक्त फक्त अखूड मादी फुलांमध्येच अंडी टाकू शकेल अशी तिची रचना असते. यामुळे अजून एक गोष्ट साध्य होते. ती म्हणजे  नर फुले आण मोठी मादी फुले प्रजननाकरिता शिल्लक राहतात.

अंडी घालून झाल्यावर ऍण्टेना आणि पंख नसलेल्या या मादीला बाहेर पडता येत नाही. ती तिथेच मरून जाते. आता तिने घातलेल्या अंडय़ामधून नर आणि मादी वास्प जन्माला येतात. त्यांचे तिथेच मिलन होते. या नर वास्पला डोळे आणि पंख नसतातच. ते जन्माला आल्यावर उंबराला छिद्र पाडायला सुरुवात करतात, पण ते कधीच या फळातून बाहेर पडू शकत नाहीत. ‘फिग वास्प’च्या नराचं अख्ख आयुष्य फक्त त्या उंबराच्या आतच जातं. या नरांनी तयार केलेल्या छिद्रातून मादय़ा उडून बाहेर निघून जातात. नवीन उंबराच्या शोधात. तोपर्यंत इकडे उंबराच्या फुलाचे रूपांतरही फळात होत आलेले असते. त्याचा कडक हिरवेपणा जाऊन ते मऊ व लालसर होते. त्याचा वास आसमंतात पसरतो आणि ही फळं खायला प्राणी, पक्षी उंबरावर येतात. यांच्या थेट बियांपासून झाडं उगवत नाही. प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या विष्ठेतून बाहेर पडल्यावरच त्या जोमाने रुजतात.

या सगळय़ांत एका साखळीत दोन साखळय़ा निसर्गाने किती चपखलपणे विणल्या आहेत. उंबराच्या फलनासाठी त्याने फिग वास्प माशीचा वापर करून घेतला आणि ती माशी सुखरूप राहावी, आपला वंश नीट वाढावा म्हणून या माशीला आयतं घर आणि संरक्षणही उपलब्ध करून दिले.

निसर्गाच्या क्लिस्ट बुद्धिमत्तेचं एक छोटसं उदाहरण, आता तरी तुम्ही उंबराचं फूल शोधत फिरणार नाही अशी आशा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या