
मुंबई–गोवा महामार्गावरील चिपळूण शहराचा वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सर्वात लांब उड्डाणपुलाच्या कामाला सध्या चांगला वेग आला आहे. येत्या मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करून पुल वाहतुकीसाठी सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेकेदार कंपनीने निश्चित केले असून त्या दृष्टीने काम युद्धपातळीवर सुरू आहे. बहादूरशेख चौक ते अतिथी हॉटेलपर्यंत हा उड्डाणपूल उभारला जात आहे. सुरुवातीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूल बांधण्याची योजना होती. मात्र, उभारणीदरम्यानच बहादूरशेख चौक येथे संरचना कोसळल्याने मोठा अडथळा निर्माण झाला. घटनेनंतर हा प्रकल्प पारंपरिक पद्धतीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
जुन्या पिलरशेजारी नवीन पिलर उभे करत काम पुन्हा सुरू करण्यात आले. सध्या बहुतांश पिलरचे काम पूर्ण झालं असून गर्डर बसवण्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी गर्डर चढवले गेले आहेत, त्या भागात स्लॅब घालण्याची तयारी सुरू आहे. रावतळे परिसरातील स्लॅबचे काम तर पूर्ण झाले आहे.उड्डाणपुलाच्या मुख्य रचनेसोबतच दोन्ही बाजूंना ॲप्रोच रोडचे कामही वेगात सुरू आहे. ॲप्रोच रोडसाठी करण्यात येणाऱ्या भिंती आणि मध्ये भरावाचे काम जलद गतीने पूर्ण केले जात आहे.
या सर्व कामांच्या गतीवरून, मार्च २०२६ अखेर हा उड्डाणपूल पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रकल्प प्राधिकरणाचा निर्धार दिसून येतो. पुल सुरू झाल्यानंतर चिपळूण शहरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या घटेल, अशी अपेक्षा आहे.




























































