
मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ चांगलेच अडचणीत आले आहेत. मंत्री कार्यालयातच हा प्रकार घडल्याने झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, मंत्री झिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे.
मंत्री कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याने मेडिकलचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यातील 35 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात रंगेहाथ पकडले. लिपिकाने मंत्री झिरवाळांच्या स्वीय सहाय्यकाच्या सूचनेनुसार लाच घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ एसीबीच्या रडारवर आहेत. शनिवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून झिरवाळ हे नॉट रिचेबल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार
हा प्रकार घडला त्या दिवशी मी मुंबईत नव्हतो. आपला या प्रकरणाशी काही संबंध असल्याचे सिद्ध झाले तर राजीनामा देणार असल्याचे झिरवाळ यांनी म्हटले होते. सोमवारी मंत्री झिरवाळ हे मुख्यमंत्र्यांना भेटून आपली बाजू मांडणार आहेत.
आदिवासी संमेलनाला गेलेच नाहीत
संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना आणि जिव्हाळा यांच्या सहकार्याने नाशिकमध्ये शनिवारी राज्यस्तरीय आदिवासी साहित्य व सांस्कृतिक संमेलन आयोजित करण्यात आले होते. अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार होते, परंतु झिरवाळ यांनी संमेलनाला दांडी मारली. त्यामुळे आयोजकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांच्या गैरहजेरीत कुसुमताई आलम, सुहास नाईक, भिकल्या धिंडा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नाशिक शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय आदिवासी साहित्य व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. मात्र दोन दिवसांपूर्वी मंत्री झिरवाळ यांच्या मंत्रालयातील दालनात लिपिकाला लाच घेताना पकडले. या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांनी संमेलनास उपस्थित राहणे टाळल्याची चर्चा आहे.

























































