मेस्सीची ऑलिम्पिकमधून माघार; अर्जेंटिना संघाला अन् चाहत्यांना धक्का

फुटबॉलपटू लियोनल मेस्सीने या वर्षी होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकमधून माघार घेतल्याने अर्जेंटिना संघाला मोठा धक्का बसलाय. 36 वर्षीय मेस्सीने स्वतःच गुरुवारी ही घोषणा केली. वाढते वय आणि व्यस्त वेळापत्रकामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले.

लियोनल मेस्सी सध्या कोपा अमेरिका स्पर्धेतील किताब अर्जेंटिनाने राखावा यासाठी जोरदार तयारी करत आहे. ही स्पर्धा 20 जून ते 14 जुलै दरम्यान रंगणार आहे. मेस्सीच्या या घोषणेमुळे अवघ्या फुटबॉल जगताचा हिरमोड झाला. मेस्सी म्हणाला, अर्जेंटिनाच्या 23 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक जेव्हियर माशचेरानो यांच्याशी मी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये न खेळण्याबद्दल चर्चा केली. सध्या आम्ही कोपा अमेरिका स्पर्धेच्या तयारीत मग्न आहोत. या स्पर्धेनंतर मला इंटर मियामी क्लबसाठीही खेळायचे आहे. माझ्या वयाचा विचार करता कोपा अमेरिका, क्लब स्पर्धा आणि पॅरिस ऑलिम्पिक असे लागोपाठ खेळणे आता शक्य नाही. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी मला नाइलाजाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये न खेळण्याचा निर्णय घ्यावा लागला. प्रशिक्षक जेव्हियर माशचेराना यांनीही मेस्सीच्या या निर्णयाचे समर्थन केले. आम्ही त्याच्या निर्णयाचा सन्मान करतोय. मेस्सी फुटबॉल जगतातील एक महान खेळाडू आहे. अर्जेंटिना संघासाठी त्याचे योगदान बहुमोल आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये संघाला त्याची उणीव भासणार आहे. मात्र, तरीही मेस्सीच्या निर्णयाला आमचे समर्थन आहे, असेही त्यांनी सांगितले.