
जेएनपीए बंदरातून द्राक्ष, कांदा, केळी व भाजीपाल्यासारख्या दोन हजारांहून अधिक नाशवंत कृषीमालाची दररोज निर्यात होते. मात्र वाहतूककोंडी आणि अन्य कारणांमुळे हा कृषिमाल जेएनपीए बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा विलंब होतो. त्यामुळे मालाची नासाडी होऊन मोठे नुकसान होते. मात्र आता शेतकऱ्यांचा टवटवीत कृषिमाल परदेशात पोहोचणार आहे. यासाठी पनवेल ते जेएनपीए असा विशेष सहा पदरी ग्रीन चॅनल महामार्ग तयार करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वाहतूककोंडी फुटणार असून नाशवंत कृषिमाल वेळेत जेएनपीएतून परदेशात जाणार आहे. या ‘ग्रीन चॅनल’चा हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
जेएनपीए बंदरात दरदिवशी लिक्विड कार्गो सह सरासरी 17 जहाजे येतात. बंदरातून वाढत्या कंटेनर हाताळणीमुळे बंदरातून दररोजच्या द्राक्ष, कांदा, केळी व भाजीपाल्यासह विविध कृषिमालाच्या दीड ते दोन हजार कंटेनरची निर्यात केली जाते. मात्र हा कृषिमाल नाशवंत असल्याने त्याला सुखरूप परदेशात पोहोचवण्यासाठी जेएनपीए प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत होती. पनवेल ते जेएनपीएदरम्यान होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे हा सर्व माल बंदरावर पोहोचण्यासाठी उशीर होत असल्याने प्रशासनाकडून या नाशवंत मालाच्या कंटेनरसाठी विशेष महामार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे हा सर्व माल बंदरातून विनाविलंब आणि सुरळीत निर्यात होणार आहे. निर्यातीदरम्यान कृषिमालाचे व व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी जेएनपीए बंदराकडून विशेष दक्षता घेतली जात असल्याची माहिती कंटेनर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बंदरात रिफर प्लग पॉइंटची व्यवस्था
नाशवंत कृषिमाल ताजा व टवटवीत राहावा यासाठी वातानुकूलित म्हणजेच रिफर कंटेनरमधून त्याची वाहतूक केली जाते. 16 फेब्रुवारी रोजी जेएनपीएतून 1 हजार 712 रिफर कंटेनरची निर्यात झाली आहे. या निर्यातीदरम्यान वेटिंगवर असलेल्या वातानुकूलित कंटेनरसाठी जेएनपीए बंदराकडून 6 हजार 417 रिफर प्लग पाइंटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात दोन हजार जनरेटरवर चालणाऱ्या रिफर प्लग पाइंटची व्यवस्था आहे. त्यात न्हावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनलवर 926, न्हावा-शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलवर 772, एनएसआयजीसीटी 310, एपीएम 980, बीएमसीटी 3240 व पार्किंग प्लाझामध्ये 135 प्लग पॉइंट बसवण्यात आले आहेत.

























































