पैठणच्या गोदावरीत धोंड्याच्या पवित्र स्नानासाठी झुंबड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पैठण

‘दक्षिण काशी’चा मान लाभलेल्या पैठण तीर्थक्षेत्रात अधिक मासानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ग्रामीण भागात ‘धोंड्याचा महिना’ धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र समजला जातो. त्यातच ‘दक्षिण गंगा’ समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीतील ‘पवित्र स्नान’ पुण्यप्रद मानले गेल्यामुळे गोदातटीचे वाळवंट व घाटाघाटांवर महिलांची झुंबड पाहायला मिळत आहे.

अधिक मासनिमित्त पैठण गोदावरी नदीच्या तिरावर पवित्र स्नान करण्यासाठी महिलांची दिवसभर मोठी गर्दी होत आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठणनगरीत अधिक मासनिमित्त गोदावरी नदीवर महिलांची मोठी गर्दी होत असून, यामुळे दररोज हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. दरम्यान, नाथांचा राहता वाडा (बाहेरील नाथमंदीर) व नाथसमाधी मंदिर (गावातील नाथमंदिर) या दोन्ही नाथमंदिरात दर्शनासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.

१६ मे ते १३ जूनपर्यंत अधिक मास (धोंड्याचा महिना) असून, यामुळे गोदावरी गंगेवर गर्दी होत आहे. याबाबत पैठण येथील पुरोहित दिनेश गर्गे यांनी सांगितले की ‘दक्षिण काशी पैठण नगरीतील गोदावरी गंगेला हिंदू धर्मशास्रात महत्त्व आहे. गंगेत स्नान केल्यावर सर्व पापांचा नाश होते. येथे कृष्णकमल तीर्थ आहे. या तीर्थाला खूप महत्त्व आहे. द्वापार युगात येथे साक्षात श्रीकृष्णांनी भेट दिली. त्यामुळे या तीर्थाला महत्त्व आहे. या तीर्थावर महिला स्नान करून बत्तासे, दीप, सोने व पितळाचे साहित्य दान करतात. गोदावरी नदीची खणानारळाने ओटी भरली जाते.

हिंदू धर्मशास्त्रात गोदास्नानाचे महत्त्व : गुरू सुयश शिवपुरी
हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासातील पर्वकाळाचे महत्त्व नमूद केलेले आहे, अशी माहिती वेदशास्त्रसंपन्न सुयश कमलाकर शिवपुरी यांनी दै.‘सामना’शी बोलताना दिली. अधिक मासनिमित्त गोदावरी नदीत तीर्थस्नान करणे पुण्यप्रद मानले गेले आहे. पैठण तीर्थक्षेत्रात गोदावरी दक्षिणाभिमुख झालेली आहे. दक्षिणमुख हे उत्तर काशीतील गंगा नदीप्रमाणे महत्त्वपूर्ण आहे. पैठणच्या गोदावरी नदीकाठी ३३ तीर्थ आहेत. पर्वणीकाळात सिंहस्थ, अधिक मास, एकादशी-गंगा दशहरा व नित्यरोज असे पवित्र पर्वकाळ आहेत. अधिक मासात गोदावरी स्नान केल्यास कायिक, वाचिक, मानसिक व सांसर्गिक दोषांचा परिहार होतो, असे हे गोदावरी महात्म्य आहे. ‘अधिक मास महात्म्य’ व ‘सिंहस्थ महात्म्य’ या धर्मग्रंथांमध्ये याबाबतचा उल्लेख आहे, असेही गुरू सुयश शिवपुरी यांनी स्पष्ट केले.