परदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये काढून घेतले 34 हजार कोटी, अमेरिकेचे 50 टक्के टॅरिफ आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे तणाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ म्हणजेच अतिरिक्त आयात शुल्क लादण्याची घोषणा केली. त्यापैकी 25 टक्के टॅरिफ लागू केले असून हिंदुस्थान आणि अमेरिकेतील व्यापार करारावरही अनिश्चिततेचे सावट आहे. त्यामुळे बाजार अस्थिर असल्याच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुतंवणूकदारांनी हिंदुस्थानी शेअर बाजारातून तब्बल 34 हजार 993 कोटी रुपयांची गंगाजळी काढून घेतल्याचे वृत्त आहे.

जुलैमध्ये गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून 17 हजार 741 कोटी रुपये काढून घेतले होते. आता ऑगस्टमध्ये हाच आकडा दुप्पट झाल्याचे चित्र आहे. 2025च्या सुरुवातीपासून हिंदुस्थानी शेअर बाजारातून गुंतवणूकदारांनी तब्बल 1.3 लाख कोटी काढून घेतले. त्यामुळे हिंदुस्थानी बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण आहे. जागतिक बाजारपेठेत हिंदुस्थानी शेअर बाजारातील समभागांचे मूल्यांकन इतर देशांच्या शेअर बाजारातील समभागांच्या तुलनेत अधिक आहे. त्याचाही परिणाम परदेशी गुंतवणुकीवर झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक विक्री

गेल्या सहा महिन्यांत ऑगस्टमध्ये हिंदुस्थानी शेअर बाजारातील पंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक विक्री झाल्याचे समोर आले आहे. सातत्याने शेअर्सची विक्री होत आहे. मात्र, प्राथमिक ऑफर्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा आयपीओ आणि इतर प्राथमिक ऑफर्सच्या माध्यमातून जवळपास 40 हजार 305 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी झाली आहे. जिथे शेअर्सचे मूल्य योग्य असते तिथे गुंतवणूक करण्याची संधी सर्वजण शोधत असतात, असे तज्ञांनी म्हटले आहे.