
जम्मू-कश्मीरच्या संबंधित कोणतेही प्रश्न हिंदुस्थान-पाकिस्तानने द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवले पाहिजेत हे आपल्या देशाचे धोरण असून, यात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे कश्मीर मुद्दय़ावर तिसऱया देशाचा हस्तक्षेप, मध्यस्थी हिंदुस्थानला मान्य नाही, अशी भूमिका आज परराष्ट्र मंत्रालयाने मांडली. युद्धविरामाच्या चर्चेत हिंदुस्थान आणि अमेरिकेच्या नेत्यांमध्ये व्यापाराचा मुद्दा नव्हता, असे स्पष्ट करीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावाही फेटाळण्यात आला.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील युद्धविराम, जम्मू-कश्मीरच्या मुद्दय़ांपर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये उडी घेतली आहे. व्यापार बंदी करण्याची धमकी देऊन युद्ध थांबवल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच ते जम्मू-कश्मीर मुद्दय़ावर तिसऱया देशाने हस्तक्षेप केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. देशातील जनता आणि विरोधी पक्ष मोदी सरकारला जाब विचारत आहे. आज परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत ट्रम्प यांचे सर्व दावे फेटाळले.
जम्मू-काश्मीचा मुद्दा द्विपक्षीय आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान आपसात तो सोडवतील. या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे तिसऱया पक्षाचा (देशाचा) हस्तक्षेप पिंवा मध्यस्थी हिंदुस्थानला मान्य नाही, असे जैस्वाल यांनी सांगितले.
प्रत्येक युद्ध हरल्यानंतर पाकिस्तान ढोल वाजवतो
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचे अनेक ठिकाणी नुकसान झाले. दहशतवादी अड्डे नष्ट केले. पाकिस्तानचा एअरबेस नष्ट केल्यानंतर त्यांनी डीजीएमओ पातळीवर चर्चेची ऑफर दिली. पाकिस्तानमधील हल्ल्यांचे, त्यांच्या नुकसानाची उपग्रह छायाचित्रे उपलब्ध आहेत. छायाचित्रेच सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. प्रत्येक युद्धात हिंदुस्थानने पाकिस्तनचा पराभव केला आहे. मात्र, प्रत्येक युद्ध हरल्यानंतर पाकिस्तान ढोल वाजवतो. ती पाकिस्तानची जुनी सवय आहे, असे जैस्वाल यांनी फटकारले.
पाकिस्तानला पीओके सोडावेच लागेल
पाकिस्तानने बेकायदेशीर व्यापलेला हिंदुस्थानचा भूभाग रिकामा करावा हा मुद्दा प्रलंबित आहे. या पाकव्याप्त कश्मीरच्या मुद्दय़ावर हिंदुस्थान चर्चा करणार आहे. पाकिस्तानला ‘पीओके’चा ताबा सोडावाच लागेल, अशी हिंदुस्थानची भूमिका असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले. ‘टीआरएएफ’ ही लश्कर-ए-तोयबाचीच दहशतवादी संघटना आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी ‘टीआरएएफ’ने घेतली होती. ‘टीआरएएफ’ला दहशतवादी संघटना म्हणून संयुक्त राष्ट्र संघात (युनो) सूचीबद्ध करू, तशी मागणी हिंदुस्थान ‘युनो’कडे करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
7 मेपासून ते 10 मे रोजी युद्धविरामापर्यंत हिंदुस्थान आणि अमेरिकन नेत्यांमध्ये लष्करी परिस्थितीवर चर्चा झाली. या चर्चेत व्यापाराचा मुद्दा कुठेही उपस्थित झाला नाही. – रणधीर जैस्वाल,प्रवक्ता, परराष्ट्र मंत्रालय
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानसाठी लक्ष्मणरेषा आखली, मोदी पोहचले आदमपूर हवाई तळावर
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानसाठी लक्ष्मणरेषा आखली, असे नमूद करतानाच यापुढेही दहशतवादी हल्ले झाल्यास दहशतवाद्यांना असेच त्यांच्या घरात घुसून मारू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावले. पंतप्रधानांनी पाकिस्तान सीमेपासून 100 किलोमीटरवर असलेल्या आदमपूर हवाई तळावर जाऊन जवानांशी संवाद साधला व त्यांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक केले.