वन महोत्सवात मिळणार सवलतीच्या दरात रोपे

वृक्ष लागवड, संवर्धन तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे यासाठी राज्यभरात 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वन विभागाकडून सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ सर्वसामान्य, शेतकरी, विद्यार्थी, निसर्गप्रेमी यांनी घेऊन हरित महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन वन विभागाने केले आहे.

राज्यात सुरू असलेला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या पुढेही अखंडपणे सुरू राहावा म्हणून या कार्यक्रमांतर्गत खासगी मालकीचे पडीक क्षेत्र आणि शेताच्या बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामूहिक पडीक क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.

सर्वसाधारण कालावधीत नऊ महिन्यांचे रोप (लहान पिशवीतील रोप) 21 रुपयांना, तर 18 महिन्यांचे रोप (मोठय़ा पिशवीतील रोप) हे 73 रुपयांना एक याप्रमाणे देण्यात येते, परंतु या वन महोत्सवाच्या काळात नऊ महिन्यांचे रोप केवळ दहा रुपयांना तर 18 महिन्यांचे मोठय़ा पिशवीतील रोप 40 रुपयांना एक याप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. दरम्यान, राज्यात पावसाळ्यात 15 जून ते 30 सप्टेंबर या काळात वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रणा व लोकांचा मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेण्यात येणार आहे.

दरम्यान, ज्या शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवड करायची आहे अशा यंत्रणांना रोप निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्यास त्यांना रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येईल. यासाठी त्यांनी लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी, नजीकचे उप वनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी,सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे पत्राद्वारे करावी असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या