आर्थिक गंडा घालणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर कारवाई

शेअर मार्केट ट्रेडिंगऐवजी फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा आणि चांगला नफा कमवा अशा प्रकारे बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर नेहरूनगर पोलिसांनी कारवाई केली. अशा प्रकारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या  मुख्य आरोपींसोबत सोहेल सोळंकी (29) हादेखील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. चुनाभट्टी येथील जोगानी इंडस्ट्रीयलमधील एका गाळय़ात बोगस कॉल सेंटर थाटले असून तेथून नागरिकांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. मोठय़ा नफ्याचे आमिष दाखवून पद्धतशीर नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची खबर नेहरू नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि काळे, पाटील, उपनिरीक्षक डमरे, गोल्हार, टेंभे व पथकाने त्या कॉल सेंटरवर छापा टाकून बोगस कॉल सेंटरमधील फसवणूक करणाऱ्यांना ताब्यात घेतले.