माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्ष निरीक्षक रावसाहेब दानवे शनिवारी नांदेडमध्ये असताना त्यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष अॅड.किशोर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर हदगाव विधानसभा मतदारसंघातही त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्या केंद्रात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. आता त्यांनी भाजपला रामराम करत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
आपण आपला राजीनामा स्वखुशीने देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुढील भूमिकेबाबत विचारले असता, त्यांनी वेट अॅण्ड वॉच असे उत्तर दिले. पक्षाचे निरीक्षक माजीमंत्री रावसाहेब दानवे नांदेडमध्ये असताना त्या पक्षाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत उपस्थित नव्हत्या. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर चिखलीकर यांच्या घरी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी चव्हाण यांच्या कार्यकाळात नांदेडमध्ये एकही उद्योग आला नाही, टेक्सकॉम बंद पडले, अन्य उद्योगही बंद पडले, त्यावेळी त्याला सत्तेतील राजकारणी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तसेच बेरोजगारीचा प्रश्न नांदेड जिल्ह्यात बिकट झाला आहे. जिल्ह्यात एकही उद्योग गेल्या दहा वर्षात आला नसल्याचे त्या म्हणाल्या. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अशोक चव्हाण यांना मिळालेले राज्यसभा सदस्यत्व ही त्यांची लायकी नाही, ते खुप मोठे होते, भाजपमध्ये गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला होता. आता त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे.