जनतेच्या प्रचंड असंतोषामुळे बांगलादेशातून पलायन करून हिंदुस्थानात आलेल्या शेख हसीना यांचा आणखी काही दिवस मुक्काम गाझियाबादच्या एअरबेसवरच राहण्याची शक्यता आहे. हसीना लंडनमध्ये आश्रय घेणार होत्या, परंतु ब्रिटन सरकारने अद्याप क्लिअरन्स दिलेला नाही. बांगलादेशातील हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी भूमिका ब्रिटनने घेतली आहे. अमेरिकेने हसीना यांचा व्हिसा रद्द केला आहे. त्यामुळे त्या कुठे जाणार, पुढे काय होणार, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत आणि संसदेत हिंदुस्थानची भूमिका स्पष्ट केली. शेख हसीना सध्या शॉकमध्ये आहेत. ऐनवेळी त्यांनी हिंदुस्थानात उतरण्याची विनंती केली. त्यामुळे परवानगी दिली. पुढची योजना काय असेल, याचा विचार करण्यासाठी हसीना यांना हिंदुस्थान सरकारने काही वेळ दिला आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्र्यांनी दिली.
बांगलादेशात आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलनाचा वणवा एवढा पेटला की, शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पलायन करावे लागले. सोमवारी सायंकाळी शेख हसीना आणि त्यांच्या बहीण शेख रेहाना बांगलादेश लष्कराच्या हेलिकॉप्टरने दिल्लीनजीक गाझियाबाद येथील हवाई दलाच्या हिंडन एअरबेसवर उतरल्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. सध्या त्यांचा मुक्काम एअरबेस येथे आहे. या परिसरातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक
बांगलादेशातील उलथापालथ आणि शेख हसीना यांनी हिंदुस्थानात घेतलेला तात्पुरता आश्रय या घडामोडींची माहिती आज केंद्र सरकारने सर्वपक्षीय नेत्यांना दिली. यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सर्व पक्षांचे नेते हजर होते.
यावेळी राहुल गांधी यांनी शेख हसीना हिंदुस्थानात आल्या आहेत. त्याचे पुढील नियोजन काय? सरकारने काय भूमिका घेतली आहे? अशी विचारणा केली. यावर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सर्व माहिती आत्ताच उघड करता येणार नाही, असे सांगितले.
अमेरिकेने शेख हसीना यांचा व्हिसा रद्द केला आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान असताना अमेरिकेला लष्करी तळासाठी परवानगी नाकारली होती. त्यामुळे अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.
बांगलादेश आपला मित्र देश राहिला आहे. देशहितासाठी सरकार जे पाऊल उचलेल त्याला आपला पाठिंबा असेल, अशी भूमिका सर्व विरोधी पक्षनेत्यांनी या बैठकीत मांडली.
बांगलादेशातील स्थितीवर लक्ष ठेवून – परराष्ट्रमंत्री
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात बांगलादेशातील घडामोडींबाबत निवेदन केले. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर हिंदुस्थानात येण्याची विनंती केली होती. त्यांची ही विनंती सरकारने मान्य केली, अशी माहिती परराष्ट्रमंत्र्यांनी दिली. बांगलादेशातील घडामोडींवर हिंदुस्थानचे बारकाईने लक्ष आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले, मंदिरांची तोडफोड ही अत्यंत चिंतेची बाब आहे. यासंदर्भात बांगलादेशचे लष्करप्रमुख वकेर-उझ-झमान यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. 11 हजार हिंदुस्थानी बांगलादेशात असून त्यात नऊ हजार विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी जुलैमध्ये मायदेशी परतल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर हायअलर्ट जारी केला असून, सुरक्षा वाढविली आहे, असे ते म्हणाले.
मोहम्मद युनूस मुख्य सल्लागार की नवे पंतप्रधान?
बांगलादेशातील मायक्रो फायनान्स, ग्रामीण बँकिंग क्षेत्रात मोहम्मद युसून यांच्या कामगिरीची जगाने दखल यापूर्वीच घेतली आहे. अॅण्टी डिस्क्रिमिनेशन स्टूडेंट मूव्हमेंटने युनूस यांनी पंतप्रधानपद स्वीकारावे अशी विनंती केली आहे. त्यामुळे युनूस पंतप्रधानपद स्वीकारतात का? हे लवकरच स्पष्ट होईल.
बांगलादेशात लवकरच नियंत्रणाखाली अंतरिम सरकार स्थापन होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘नोबल’ पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस हे या सरकारचे मुख्य सल्लागार असतील. युनूस यांनीही यासाठी सहमती दर्शविली आहे, मात्र विद्यार्थ्यांनी युनूस यांनीच पंतप्रधान व्हावे यासाठी आग्रह धरला आहे.
शेख हसीना यांना आश्रय देऊ; पण त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, अशी ब्रिटन सरकारची भूमिका आहे. यासंदर्भात ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॉमी यांनी सांगितले. बांगलादेशात गेल्या दोन आठवडय़ांत झालेला हिंसाचार आणि नागरिकांचा मृत्यू याची संयुक्त राष्ट्रसंघाच्या टिमने निष्पक्ष चौकशी करावी.
ब्रिटनने आश्रय दिला नाही तर शेख हसीना फिनलॅण्डला जाऊ शकतात. फिनलॅण्डमध्ये हसीना यांचे नातेवाईक आहेत.
बांगलादेश घडामोडीत पाकिस्तानचा हात
सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधी यांनी बांगलादेशातील हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात आहे का, असा थेट सवाल केला. यावर यात परकीय शक्तींचा हात असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्या दिशेने तपास सुरू आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले. म्हणाले.
दिवसभरात काय घडले…
सर्वपक्षीय बैठकीत सर्व नेत्यांनी विविध मुद्दय़ांवर हिंदुस्थान सरकारला पाठिंबा दर्शवला. याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले.
बांगलादेशातील अंतरिम सरकारमध्ये प्रमुख सल्लागार म्हणून अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या नावाची शिफारस विद्यार्थी चळवळीने केली आहे.
बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आज संसद बरखास्त केली. तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर संसद बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.