20 दिवस मृत्युदंडाच्या कोठडीत ठेवले, सलग पाच दिवस वीज घालवली; इम्रान खान यांचे लष्करप्रमुखांना पुन्हा खुले पत्र

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दुसऱ्यांदा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनार यांना खुले पत्र लिहून सरकारवर सडकून टीका केली. माझ्यावर सातत्याने दबाव टाकला जात असून जिथे सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही अशा मृत्युदंडाच्या कोठडीत मला 20 दिवस ठेवण्यात आले. येथील वीज सलग पाच दिवस खंडित केली गेली, असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्यांनी आज ‘एक्स’वर हे पत्र शेअर केले. इम्रान खान गेल्या एक वर्षाहून अधिक काळ रावळपिंडीतील आदियाला तुरुंगात आहेत.

इम्रान यांनी 3 फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या त्यांच्या पहिल्या पत्रानंतर आणखी एक पत्र लिहिले. ते म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असून गेल्या सहा महिन्यांत केवळ तीन वेळा मला माझ्या मुलांशी बोलण्याची परवानगी देण्यात आली. लष्कर आणि जनतेमधील वाढती दरी कमी व्हावी या हेतूने राष्ट्राच्या हितासाठी खुले पत्र लिहिले आहे. माझ्या पहिल्या पत्राला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.  पाकिस्तानचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी सर्व आयुष्य घालवले आहे. लष्कर ही देशाची एक महत्त्वाची संस्था आहे. मात्र, त्यातील काही अप्रवृत्तीची लोक प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवत आहेत.

दबाव आणण्यासाठी छळ इम्रान

दबाव आणण्यासाठी तुरुंगात छळ होत असल्याचा आरोप इम्रान यांनी पाकिस्तान सरकारवर केला. मी कोठडीत पूर्णपणे अंधारात राहिलो. व्यायामाचे साहित्य, दूरदर्शन आणि वर्तमानपत्रे काढून घेण्यात आली. 40 तासांसाठी बंदिस्त ठेवण्यात आले. मुलांशी संवाद साधण्यापासून रोखले जात आहे. शिवाय माझे मूलभूत आणि कायदेशीर अधिकार हिरावून घेतले जात आहेत. फक्त काही मोजक्याच लोकांना मला भेटण्याची परवानगी देण्यात आली, असा आरोप इम्रान यांनी केला आहे.