
हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातील सोझाजवळ पर्यटकांच्या एका ट्रॅव्हलर वाहनाला भीषण अपघात झाला आहे. हे वाहन रस्त्यावरून थेट दरीत कोसळल्याने 4 पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या ट्रॅव्हलर वाहनामध्ये एकूण 22 ते 23 प्रवासी होते. सोझा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन थेट खोल दरीमध्ये कोसळले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, महसूल विभाग, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे बचाव मोहीम हाती घेतली. या मोहिमेत स्थानिक रहिवाशांनी अत्यंत महत्त्वाची आणि कौतुकास्पद भूमिका बजावली.
बचाव पथकाला आतापर्यंत एकूण 18 प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून जखमींना तातडीने सीएच बंजार आणि प्रादेशिक रुग्णालय कुल्लू येथे हलवण्यात आले. प्रादेशिक रुग्णालयाचे डॉ. हिरालाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पीजीआय चंदिगड येथे रेफर करण्यात आले आहे. तसेच या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.
#WATCH | Kullu, Himachal Pradesh: Dr Hiralal of Regional Hospital Kullu says, “…There were 23 people, including children, in the traveller vehicle. Four died on the spot. The rest are admitted here and are undergoing treatment. Three of them, who are seriously injured, are… https://t.co/Pl22PicSkQ pic.twitter.com/rDdN7ANKBG
— ANI (@ANI) April 5, 2026
दरम्यान, कुल्लूचे जिल्हा दंडाधिकारी अनुराग चंदर शर्मा यांनी सांगितले की, शोध आणि पडताळणी मोहीम अजूनही सुरू आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकांनी वेळेवर केलेल्या मदतीमुळे 18 जणांचे प्राण वाचवता आले आहेत. जखमींना सर्वोत्तम उपचार देण्यास आमचे प्राधान्य आहे, असेही ते म्हणाले.
























































