मुंबईच्या तलावांत पावसाची कृपा; पाणीपातळीत 4 टक्क्यांची वाढ

मुंबई, ठाणे परिसरात मागील 24 तासांत पावसाने समाधानकारक हजेरी लावली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत वरुणराजाने चांगली कृपा केली. तलावक्षेत्रात या हंगामातील एका दिवसातील सर्वाधिक वाढ नोंद झाली. शनिवारी रात्रीपासून जोर धरलेल्या पावसामुळे सातही तलावांच्या पाणीपातळीत जवळपास 4 टक्क्यांची वाढ झाली आहे.

संपूर्ण जुलैमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व तलाव ‘ओव्हरफ्लो’ होण्याची शक्यता आहे. तुळशी, विहार, भातसा, मोडक सागर, तानसा अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या सात तलावांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई 10 जुलैपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात बुधवारपर्यंत येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.