अशोक चव्हाण यांची बदनामी केल्याच्या आरोपातून चौघांची निर्दोष मुक्तता

65

सामना प्रतिनिधी । नांदेड

शीख समाजातील हुजूरी क्रांती संघटना या व्हॅटस्अ‍ॅप ग्रुपवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची बदनामी करणारा असभ्य मजकूर टाकून त्यांची बदनामी केल्याच्या आरोपातून जगदीपसिंघ नंबरदार यांच्यासह चार जणांची नांदेडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १२ फेब्रुवारी २०१५ रोजी उपरोक्त व्हॅटस्अ‍ॅप ग्रुपवर अशोक चव्हाण यांची बदनामी करणारा मजकूर समाविष्ट करण्यात आला होता. याची दखल घेवून गुरुव्दारा बोर्डाचे सचिव रवींद्रसिंग बुंगई यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत लखविंदरसिंघ लख्खी, पुरुषोत्तमसिंघ लख्खीसिंघ चुग, जगदीपसिंघ नंबरदार आणि जगदीपसिंघ चौहाण यांना आरोपी करण्यात आले होते. पोलिसांनी त्यांच्याविरुध्द २९४ व ३४ या भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

न्यायाधीश सतीश हिवाले यांच्यासमोर हा खटला चालला. न्यायालयाने या संदर्भात दोन साक्षीदार आणि पंचाचे म्हणणे ऐकून घेतले. या सर्व प्रकरणात न्यायाधीश हिवाले यांनी रवींद्रसिंघ बुंगई यांचे आरोप फेटाळून लावत आरोपींना निर्दोष मुक्त केले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड.मिलिंद एकताटे आणि अ‍ॅड.आर.जी.परळकर तसेच अ‍ॅड. मोहनदास जहागीरदार यांनी काम पाहिले.

आपली प्रतिक्रिया द्या