65 हजार अमेरिकन डॉलरच्या ऐवजी कोऱ्या कागदांचे बंडल दिले

हिंदुस्थानी चलनाच्या मोबदल्यात अमेरिकन डॉलर देतो असे सांगत एका कंपनीच्या अकाऊंटंटने 56 लाख 34 हजार रुपये ऑनलाईन घेतले. परंतु मोबदल्यात 65 हजार अमेरिकन डॉलरच्या नावाने कोऱया कागदांचे दोन बंडल देऊन तो शिताफीने पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

समीर कांबळे असे त्या झोलरचे नाव असून तो एका टुर्स अॅण्ड ट्रव्हल्स प्रा. लि. कंपनीत अकाऊंटंटचे काम करत होता. कैलास नावाचा एजंट हा विविध कंपन्यांना हिंदुस्थानी चलनाच्या मोबदल्यात परदेशी चलन मिळवून देण्याचे काम करतो. दरम्यान, समीर कांबळे याच्याकडे अमेरिकन डॉलर उपलब्ध असल्याची माहिती कैलासने चार कंपन्यांना दिली होती. त्या पंपन्यांनादेखील अमेरिकन डॉलर हवे असल्याने त्यांनी समीर काम करत असलेल्या टुर्स अॅण्ड टॅव्हल्स प्रा. लि. कंपनीच्या खात्यात एपूण 56 लाख 34 हजार रुपये पाठविले होते. त्यानंतर या पैशांच्या मोबदल्यात समीर कांबळे याने 65 हजार अमेरिक डॉलर दोन वेगवेगळय़ा बंडलमध्ये कैलास यांना दिले. त्यानंतर कैलास यांनी ते पैसे मुंबई सेंट्रल येथे पटनाकर इंटरप्रायझेज कंपनीच्या कार्यालयात जाऊन ते दोन बंडल नईम सय्यद यांच्याकडे दिले व तुम्ही ते डॉलर वाटून घ्या असे सांगितले. नईम यांनी ते दोन्ही लिफाफे उघडून पैसे पाहिले असता त्यांना धक्काच बसला. कारण बंडलच्या वर आणि खाली फक्त अमेरिकन डॉलर होते. तर आतमध्ये त्या नोटांचे आकाराचे कोरे कागद होते.

जेजुरी येथून आरोपी समीर कांबळेच्या मुसक्या आवळल्या

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नईम यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून समीर कांबळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो जेजुरी येथे लपला असल्याची माहिती मिळताच नागपाडा पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन समीर कांबळे याच्या मुसक्या आवळल्या.