
पतीला त्याच्या प्रेयसीपासून दूर करण्याकरिता आलेल्या एका महिलेवर जादूटोण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने अत्याचार केल्याचा प्रकार खालापूर परिसरात उघडकीस आला आहे. या बाबाच्या विरोधात एकापाठोपाठ एक अशा दोन महिलांनी तक्रार केल्यानंतर खालापूर पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या सेक्सस्कँडलमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला असतानाच खालापुरातही खरातचा आवतार उघड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खालापूर पोलिसांनी अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असे आहे. सांताक्रूझ येथील पीडित महिला तिचा पती प्रेयसीपासून दूर जावा यासाठी उपाय करण्याकरिता कळंबोली येथे बाबाजानकडे आली होती. उपाय करण्याच्या बहाण्याने या भोंदूबाबाने खालापूर तालुक्यातील महड येथील निर्जन ठिकाणी असलेल्या फार्महाऊसवर नेले. मध्यरात्रीच्या वेळी हा अघोरी पूजाविधी करत महिलेवर अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्यता केली तर काळी जादू करून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडित महिलेने रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांची भेट घेऊन सविस्तर माहिती त्यांच्या कानावर घातली. त्यानंतर खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून भोंदूबाबाला अटक केली. या बाबाच्या विरोधात आणखी एका महिलेनेही अत्याचाराची तक्रार केली आहे. अन्य किती महिलांना बाबाने फसवले आहे याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
…तर पोलिसांशी संपर्क साधा
पीडित विवाहित महिलेचे तिच्या पतीबरोबर पटत नव्हते. तसेच पतीचे इतर महिलेबरोबर अफेअर असल्याची शंका तिला होती. यावर उपाय मिळावा व सल्ला घेण्यासाठी बाबाजानकडे आली होती. तिला भीती दाखवून बाबाने तिच्यावर अत्याचार केला. या बाबाकडून फसवणूक झालेल्या महिलांनी खालापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस विशाल नेहूल यांनी केले आहे.
























































