
कांदिवली येथे दोन कुटुंबीयांनी रस्त्यावर उतरून फ्री स्टाईलने हाणामारी केल्याची घटना घडली. या हाणामारीत राम लखन यादव या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तिघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. अवधेश चौहान, संजय चौहान आणि कमलेश चौहान अशी त्याची नावे आहेत.
कांदिवलीच्या लालजी पाडा येथे यादव आणि चौहान कुटुंबीय राहतात. गेल्या आठवडय़ात यादव आणि चौहान कुटुंबीय भिडले. फ्री स्टाईलने हाणामारी करू लागले. बॅट, काठय़ा जे हाताला मिळेल हे घेऊन एकमेकांवर हल्ला करत होते. राम लखन यादव हे घरात होते तेव्हा तिघांनी त्याच्यावर हल्ला करून जखमी केले. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल झाले होते. घडल्या प्रकाराची माहिती समजताच कांदिवली पोलीस घटनास्थळी आले.
पोलिसांनी राम यादव यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करून पुन्हा घरी नेण्यात आले. रात्री यादव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
यादव यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक संतप्त झाले. आरोपीवर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंतिम विधी करणार नाही असा पवित्रा घेतला. यादव यांच्या हत्येप्रकरणी कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच तिघांना पोलिसांनी अटक केली. नेमका घटनाक्रम आणि वाद काय होता याचा तपास कांदिवली पोलीस करत आहेत.
@MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra “Day light clashes between two groups in Kandivali, police should take strict action.” pic.twitter.com/xhnQFRUwo6
— Zuber Ansari (@zuberansari107) September 4, 2025