‘भाविसे’ने वृक्षांना शिवबंधन बांधून साजरा केला फ्रेंडशिप डे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

रविवारी शहरभर तरुणाईकडून हिंदू संस्कृतीचे धिंडवडे काढीत फ्रेंडशिप डे साजरा होत असतानाच भाविसे आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षांना शिवबंधन बांधून फ्रेंडशिप डे साजरा करीत समाजासमोर आदर्श ठेवला. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा असेल तर यापुढे वृक्षांनाच मित्र करा, असा संदेशही या आगळ्यावेगळ्या फ्रेंडशिप डेमधून देण्यात आला.

पाश्चात्य संस्कृती अंगीकारल्या जात असल्याने हिंदुस्थानातही फ्रेंडशिप डेचे भूत तरुणाईचा मानगुटीवर बसले आहे. या फ्रेंडशिप  डेच्या नावाखाली तरुणाईकडून बीभत्स संस्कृतीचे दर्शन समाजाला घडविले जाते. त्याला विरोध होण्याऐवजी हे प्रकार फोफावत चालले आहेत. अशा परिस्थितीत भाविसे आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आगळावेगळा पायंडा पाडून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

सध्या राज्यभर वृक्षारोपणाची मोहीम सुरू आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचे अमर लोखंडे, रजत कुलकर्णी, रूपेश पवार, सुमित भाले, स्वप्निल डिडोरे, शुभम पवार, सुबोध मोरे, आशिष पांढरे यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरालगत असलेल्या हनुमान टेकडीवर वृक्षारोपण करून १२० झाडे लावली आहेत. शहरभर तरुणाईकडून फ्रेंडशिप डेच्या नावाखाली बीभत्सपणा सुरू असताना भाविसे आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या वृक्षालाच शिवबंधन बांधून फ्रेंडशिप डे साजरा केला. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना ‘झाडे लावा, झाडे जगवा’ चे महत्त्व विशद करून सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षालाच आता मित्र करावे लागणार असल्याचा आगळा वेगळा संदेशही त्यांनी यातून दिला.