
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात इंधनाचे संकट निर्माण झाले असून याचा मोठा फटका शेजारील देश असलेल्या नेपाळलाही बसला आहे. नेपाळमधील पेट्रोल आणि डिझेलची भीषण टंचाई लक्षात घेता बालेन शहा सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटामुळे इंधनाची बचत करण्यासाठी आता नेपाळमध्ये आठवड्यातून दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे वृत्त एएनआयने (ANI) दिले आहे.
नेपाळ सरकारच्या नवीन निर्णयानुसार, आता सर्व सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस साप्ताहिक सुट्टी असेल. सरकारचे प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री सस्मित पोखरेल यांनी या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, इंधन पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला असून सोमवारपासून या नवीन व्यवस्थेची अंमलबजावणी सुरू होईल.
कार्यालयांच्या वेळेतही बदल
इंधन टंचाईवर मात करण्यासाठी सरकारने केवळ सुट्ट्याच वाढवल्या नाहीत, तर कामकाजाच्या वेळेतही बदल केला आहे. आता सरकारी कार्यालयांची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी निश्चित करण्यात आली आहे. इंधनाचा वापर कमी करणे आणि पर्यावरण संरक्षण हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारने सांगितले आहे.
Nepal | In the cabinet meeting of the Nepal government, it was decided to give two days’ holiday every week in view of the shortage of petroleum.
(Source: PMO) pic.twitter.com/p6CiVFQ3RB
— ANI (@ANI) April 5, 2026

























































